TakaTak Short Video Making App: 'टिकटॉक ला पर्याय म्हणून MX Player ने सादर केले 'टकाटक अ‍ॅप'; शॉर्ट व्हिडीओ बनवले झाले सोपे, जाणून घ्या फीचर्सबद्दल
MX Player TakaTak (Photo Credit Twitter)

काही दिवसांपूर्वी भारत सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत, लोकप्रिय व्हिडिओ मेकिंग अॅप टिकटॉक  (TikTok) सह 59 चायनीज अॅप्सवर बंदी घातली आहे. या  बंदीनंतर भारतामध्ये आता देशी अॅप्सला प्रोत्साहन देणे सुरु झाले आहेत. देशातील अनेक कंपन्यांनी चायनीज अॅप्सला पर्याय शोधला आहे. अशात टिकटॉकला पर्याय म्हणून MX Player ने टकाटक (TakaTak) नावाचे अॅप सादर केले आहे. टाकाटक अ‍ॅप टिकटॉकसारखेच आहे, जिथे वापरकर्ते छोटे व्हिडिओ तयार करू शकतात. या देशी अ‍ॅपवर तुम्ही फन व्हिडिओ बनवू शकता, पाहू शकता आणि सोशल मीडियावर शेअरही करू शकता.

टकाटक हे अ‍ॅप गूगल प्ले-स्टोअर वरून डाऊनलोड करता येईल. सध्या तरी हे अ‍ॅप फक्त अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे, पण लवकरच अॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर हे अॅप लॉन्च होईल, अशी अपेक्षा आहे. हे अ‍ॅपदेखील वापरकर्त्यांना डायलॉग डबिंग, कॉमेडी, गेमिंग, DIY, फूड, स्पोर्ट्स, मीम्सची सुविधा पुरवत आहे. एडिटिंगचे फिचर वापरून, वापरकर्ते क्रिएटिव्ह व्हिडिओ तयार करून तो ऑनलाइन शेअर करू शकतात. याशिवाय आपण ब्युटी कॅम पर्याय वापरून ब्युटी इफेक्ट देऊ शकता. व्हिडिओ एडिटिंग फिचरद्वारे आपण वेगवेगळे व्हिडिओ एकत्र जोडू शकता आणि टाइमिंगला अजस्ट करू शकता. (हेही वाचा: WhatsApp वर युजर्सला आता मिळणार Telegram सारखे अ‍ॅनिमेटेड स्टिकर्स)

या सर्व फीचर्ससह वापरकर्त्यांना म्यूजिक लायब्ररीदेखील उपलब्ध आहे. भाषेबद्दल बोलायचे झाले तर, वापरकर्ते हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली, गुजराती, मराठी, पंजाबी आणि इंग्रजी अशा भाषांमध्ये व्हिडिओ तयार करू शकता. तर अशाप्रकारे टिकटॉक जरी बंद झाले असले तरी, आता टकाटक उपलब्ध झाले आहे. 7 जुलै रोजी हे अ‍ॅप सादर झाले असून आतापर्यंत, 50 हजारपेक्षा जास्त लोकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे. या अ‍ॅपला प्ले स्टोअरवर 4.1 स्टार रेटिंग मिळाले आहेत.