Rat (PC - Twitter)

याआधी शास्त्रज्ञांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर भाजीपाला पिकवण्यात यश मिळवले होते. आता अंतराळात मानवाचे पुनरुत्पादन शक्य व्हावे यासाठी वैज्ञानिक त्या दिशेने काम करत आहेत. जपानी शास्त्रज्ञांना याबाबतीत मोठे यश मिळाले आहे. शास्त्रज्ञांच्या एका गटाने म्हटले आहे की, त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात उंदराचे भ्रूण विकसित केले आहे. यावरून असे सूचित होते की मानवाला अवकाशात पुनरुत्पादन करणे शक्य आहे.

यामानाशी विद्यापीठाच्या (University of Yamanashi) प्रगत जैवतंत्रज्ञान केंद्राचे प्राध्यापक तेरुहिको वाकायामा (Teruhiko Wakayama) आणि जपान एरोस्पेस स्पेस एजन्सी (JAXA) च्या टीमने ऑगस्ट 2021 मध्ये रॉकेटच्या मदतीने गोठलेले उंदराचे भ्रूण इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये पाठवले.

अंतराळात गेल्यानंतर एका विशेष उपकरणाद्वारे गोठलेले भ्रूण सामान्य केले गेले आणि त्यानंतर ते 4 दिवस अंतराळ स्थानकात विकसित केले गेले. NDTV च्या रिपोर्टनुसार, यासंबंधीचा अभ्यास iScience नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. यामध्ये संशोधकांनी म्हटले आहे की, गुरुत्वाकर्षणाचा गर्भावर विशेष परिणाम झाला नाही. पृथ्वीवरील प्रयोगशाळेत जेव्हा भ्रूणांच्या ब्लास्टोसिस्ट्सची चाचणी घेण्यात आली तेव्हा असे आढळून आले की, भ्रूणांच्या डीएनए आणि जनुकांच्या स्थितीत विशेष बदल झालेला नाही. (हेही वाचा: Sex-related Y Chromosome: शास्त्रज्ञांनी सोडवला लिंगाशी संबंधीत 'Y क्रोमोसोम' चा गुंता)

जपानच्या यामानशी विद्यापीठ आणि राष्ट्रीय संशोधन संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे की, सस्तन प्राणी अवकाशात वाढू शकतात हे दाखवणारा हा पहिला अभ्यास आहे. हा जगातील पहिला अभ्यास आहे, ज्यामध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये सस्तन प्राण्यांचे भ्रूण संवर्धन करण्यात आले आहे. मात्र, अभ्यासात असे म्हटले आहे की भविष्यात हे पाहावे लागेल की सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये संवर्धन केलेले ब्लास्टोसिस्ट उंदरांमध्ये प्रत्यारोपित केल्यावर त्यांना प्राण्यांना जन्म देऊ शकतील का. भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी हा अभ्यास महत्त्वाचा ठरू शकतो.