First Movie in Space: इतिहासात पहिल्यांदाच! अंतराळात होणार Russian चित्रपटाचे शुटींग; आज अभिनेत्री, दिग्दर्शकासह संपूर्ण टीम होणार रवाना 
प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credits: Instagram)

आपल्या चित्रपटासाठी दिग्दर्शक-निर्माते खूपच मेहनत घेतात. एखादा सीन किंवा शॉट जोपर्यंत मनाजोगता येत नाही तोपर्यंत त्यांचे प्रयत्न चालू असतात. अशा परिपूर्णतेसाठी जगभरातील अनेक कठीण ठिकाणीही शुटींग केले गेले आहे. आता मानवी इतिहासात प्रथमच रशिया (Russia) अशी गोष्ट करणार आहे ज्याची क्वचितच कोणी कल्पना केली असेल. अंतराळ (Space) क्षेत्रात अमेरिकेसारख्या देशाला मागे टाकण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून रशिया, अंतराळात एका चित्रपटाचे शुटींग (Shooting) करणार आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) या चित्रपटाचे चित्रीकरण केले जाईल.

या चित्रपटाच्या शुटींगसाठी अभिनेत्रीसह संपूर्ण क्रू मंगळवारी रवाना होईल. हे मिशन जर का यशस्वी झाले, तर हॉलीवूडला मागे टाकून अंतराळात शुटींग करणारा रशिया जगातील पहिला देश ठरेल. याआधी अमेरिकन स्पेस एजन्सी नासा (NASA) आणि एलोन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने अभिनेता टॉम क्रूझसोबत एका प्रोजेक्टवर काम करण्याची घोषणा केली होती. या चित्रपटाचे शुटींग अंतराळात होणार होते. परंतु नंतर याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

आता 37 वर्षीय अभिनेत्री युलिया पेरेसिल्ड (Yulia Peresild) आणि 38 वर्षीय दिग्दर्शक क्लिम शिपेन्को (Klim Shipenko) हे आपल्या चित्रपटाच्या शुटींगसाठी आज अंतराळात रवाना होत आहेत. रशिया त्यांना माजी सोव्हिएत कझाकिस्तानमधील बैकोनूर कॉस्मोड्रोममधून पाठवू शकते. हे लोक अनुभवी अंतराळवीर अँटोन श्काप्लेरोव्ह (Anton Shkaplerov) यांच्या नेतृत्वाखाली अवकाशात प्रवास करतील. (हेही वाचा: भारताचे मिशन Chandrayaan-2 चे मोठे यश; ऑर्बिटरने लावला चंद्रावरील पाण्याचे रेणू आणि हायड्रॉक्सिलचा शोध)

हा क्रू 12 दिवसांच्या मोहिमेसाठी सोयुझ एमएस -19 अंतराळयानाद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी रवाना होईल. या ठिकाणी 'द चॅलेंज' या चित्रपटाचे चित्रीकरण केले जाईल. चित्रपटामधील वेगवेगळी दृश्ये इथे चित्रीत केली जातील. या चित्रपटात एका महिला डॉक्टरची कथा दाखवली जाणार आहे, जी अंतराळवीरांना वाचवण्यासाठी ISS मध्ये जाते. रशियाची अंतराळ संस्था Roscosmos ने याबाबत माहिती दिली आहे. युलिया पेरेसिल्ड गेल्या अनेक महिन्यांपासून या मिशनसाठी खास प्रशिक्षण घेत होती.