कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीमध्ये रिलायन्स जिओने (Reliance Jio) आपल्या ग्राहकांना एक उत्तम भेट दिली आहे. कंपनीने सध्याचा लॉकडाऊन आणि लोकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता 300 मिनिटे विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे तर, जिओ आपल्या ग्राहकांना एका रिचार्जवर दुसरा रिचार्ज फ्री देत आहे. या ऑफरचा फायदा फक्त जिओ फोन (Jio Phone) वापरकर्त्यांनाच मिळेल. जे लोक सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या फोनचा रिचार्ज करू शकत नाहीत अशा लोकांना या ऑफरचा फायदा होणार आहे. आपल्या ग्राहकांना नवीन ऑफर देण्यासाठी जिओने रिलायन्स फाऊंडेशनबरोबर भागीदारी केली आहे.
कंपनीने ग्राहकांसाठी एकूण दोन सुविधा जाहीर केल्या आहेत. पहिल्या ऑफरबाबत बोलायचे झाले तर, जिओफोन ग्राहकांना कोरोना साथीच्या काळात दरमहा 300 विनामूल्य मिनिटे दिली जातील. दररोज 10 मिनिटांप्रमाणे ही 300 मिनिटे ग्राहकांना दिली जातील. या सुविधेचा लाभ अशा ग्राहकांना देण्यात येणार आहे, जे सध्या साथीच्या आजारामुळे त्यांचे जिओ फोन रिचार्ज करण्यास अक्षम आहेत.
दुसऱ्या ऑफरबद्दल बोलायचे तर, जिओ फोन वापरकर्ते जो कोणता रिचार्ज करतील त्यांना त्याच किंमतीचा एक अतिरिक्त रिचार्ज प्लॅन विनामूल्य मिळेल. उदाहरणार्थ, जिओ फोन ग्राहकाने 75 रुपयांचा रिचार्ज केल्यास त्याला 75 रुपयांचा अतिरिक्त प्लान विनामूल्य दिला जाईल. कंपनीने या ऑफरला ‘बाय वन गेट वन’ असे नाव दिले आहे. कंपनीने हे स्पष्ट केले आहे की, जिओची नवीन ऑफर वार्षिक योजना किंवा जिओफोनच्या बंडल ऑफरवर लागू होणार नाही. (हेही वाचा: Paytm युजर्ससाठी मोठी बातमी, पेमेंट करतेवेळी आता द्यावा लागणार नाही 'हा' शुल्क)
मुकेश अंबानी यांच्या कंपनीने एक प्रसिद्धीपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. रिलायन्सने म्हटले आहे की, या आव्हानात्मक कठीण परिस्थितीत प्रत्येक भारतीयाला सपोर्ट करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. साथीच्या काळात या समस्येचा सामना करण्यासाठी आम्ही आमच्या ग्राहकांना प्रत्येक मार्गाने मदत करत राहू.