PM Narendra Modi Quits Weibo: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वरून घेतला निरोप; सर्व पोस्ट्स, फोटो केले डिलीट
PM Narendra Modi | (Photo Credits: ANI)

भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या दरम्यान भारत सरकारने 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायक्रो-ब्लॉगिंग चिनी अॅप ‘Weibo’ वरून आपले खाते काढून टाकले आहे. या अ‍ॅपला पीएम मोदी यांनी सन 2015 मध्ये जॉईन केले होते. भारत सरकारने बंदी घातलेल्या 59 अ‍ॅप्सच्या यादीमध्ये Weibo चादेखील समावेश आहे. आता या अ‍ॅपवरील पंतप्रधान मोदींच्या खात्यावर अपलोड केलेल्या सर्व पोस्ट आणि त्यांचा फोटोही हटवण्यात आला आहे. मिळालेय माहितीनुसार, व्हीआयपी खात्यांसाठी, Weibo सोडण्याची प्रक्रिया खूप लांब आणि क्लिष्ट आहे, अशा परिस्थितीत पंतप्रधानांना ही साइट सोडण्यास थोडा वेळ लागला.

पंतप्रधान मोदींच्या Weibo वर 115 पोस्ट होत्या, ज्यांना मन्युअली हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 113 पोस्ट काढून टाकल्या. उर्वरित दोन पोस्ट अशा होत्या की, तिथे पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे फोटो होते. या दोन पोस्ट हटवण्यास थोडा वेळ लागला. आज ही प्रक्रिया पूर्ण झाली. इथे पंतप्रधान मोदींच्या Weibo खात्यात 2,44000 लोक कनेक्ट होते, त्यामध्ये मोठ्या संख्येने चिनी लोक होते. 2015 मध्ये या अॅपवर खाते सुरु करताना, पंतप्रधान मोदींनी अशी आशा केली होती की, दोन्ही देशांमधील संबंध अधिक सौहार्दपूर्ण असतील. (हेही वाचा: टिकटॉक बॅन होताच भारतीयांंना Chingari App देणार व्हिडीओ शेअरिंग ला प्लॅटफॉर्म)

2015 मध्ये पंतप्रधान मोदींच्या चीन भेटीच्या काही काळाआधीच हे खाते तयार केले गेले होते. अलीकडे, गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैन्याच्या दरम्यान झालेल्या हिंसक झटापटीमध्ये 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. या हिंसक संघर्षानंतर देशभरात चिनी अ‍ॅप्सवरतसेच चिनी वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी होत होती. त्यानंतर भारत सरकारने Tik Tok, UC Browser सह 59 अॅप्सवर बंदी घातली आहे. या अॅप्समध्ये Helo, Likee यासारख्या अनेक लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे. दरम्यान आज केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत, चिनी कंपन्या भारताच्या महामार्ग प्रकल्पात (Highway Projects) भाग घेऊ शकणार नसल्याचे सांगितले.