आता फोन चार्ज करण्यासाठी किंवा टीव्ही चालवण्यासाठी तुम्हाला विजेची गरज भासणार नाही. तुमच्या लघवीपासून (Pee Power) वीज निर्मिती करून तुम्ही घरात हवी तेवढी वीज वापरू शकता. डेली स्टारच्या वृत्तानुसार, शास्त्रज्ञांना मूत्रातून निर्माण होणाऱ्या विजेवर करण्यात आलेल्या संशोधनात यश आले आहे. यासोबतच भविष्यात लोकांना सौरऊर्जा आणि पवन ऊर्जेपासून निर्माण होणाऱ्या विजेसोबत, मुत्रापासून निर्माण होणाऱ्या विजेचाही पर्याय मिळेल. ऊर्जेसाठी हा एक स्वच्छ पर्याय तर असेलच, पण तो खूप स्वस्तही असेल.
ब्रिस्टल, यूके येथील संशोधकांच्या पथकाने मानवी मल आणि मूत्रापासून बनविले जाणारे नवीन स्वच्छ ऊर्जा इंधन सेल विकसित केले आहे. हा सेल मानवी मल-मुत्राला विजेमध्ये रूपांतर करू शकतो. असा दावा केला जात आहे की, या सेलपासून बनवलेल्या विजेच्या मदतीने तुम्ही दिवसभर घर उजळून टाकू शकता. रिपोर्टनुसार, हा पी पॉवर प्रकल्प 2 वर्षांपूर्वी Glastonbury Festival सर्वांसमोर दाखवण्यात आला होता.
याठिकाणी शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले होते की, मूत्रातून वीज तयार केली जाऊ शकते. यानंतर युरीनपासून वीज बनवून मोबाईल फोन, लाईट, टीव्ही आणि घरे उजळवण्याचे काम सुरू झाले. ब्रिस्टल बायो एनर्जी सेंटरच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार त्यांनी 5 दिवस चाललेल्या या फेस्टिव्हलमध्ये आलेल्या लोकांनी टॉयलेटमध्ये जितकी लघवी केली त्यापासून, ताशी 300 वॅट्स वीज निर्माण करण्यात यश मिळवले. दुसऱ्या शब्दांत, मूत्रापासून बनवलेल्या या विजेच्या मदतीने तुम्ही 10 वॅट क्षमतेचा बल्ब 30 तासांपर्यंत लावू शकता.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या संशोधनात डोळ्यांना न दिसणार्या सूक्ष्मजंतूंचा वापर करण्यात आला. शास्त्रज्ञांनी एक बॉक्स सारखी पेशी सूक्ष्मजंतूंनी भरली. हे सूक्ष्मजंतू गवत, मानवी मूत्र यासह कोणतेही सेंद्रिय पदार्थ खातात आणि त्याचे विजेमध्ये रूपांतर करतात. वीजनिर्मितीनंतर उरलेला अवशेष खत म्हणून वापरता येतो.
अहवालानुसार, प्रत्येक व्यक्ती दिवसाला सरासरी 2.5 लीटर लघवीची निर्मिती करते. अशा परिस्थितीत जर कुटुंबात चार लोक असतील तर दररोज सुमारे 10 लिटर लघवी एकत्र होऊ शकते. मायक्रोबियल फ्युएल सेल कार्य करण्यासाठी आणि सतत वीज निर्माण करण्यासाठी इतके मूत्र पुरेसे आहे. म्हणजेच घरामध्ये सोडल्या जाणाऱ्या मूत्रातून वीज निर्माण करून टीव्ही, बल्ब, मोबाईल चार्ज यांसारखी सर्व कामे तुम्ही करू शकता.