Paytm ने लॉन्च केले नवे फिचर; कोविड-19 लसीसाठी करता येणार Slot Booking
Paytm (Photo Credits: IANS)

कोविड-19 लसी (Covid-19 Vaccine) साठी स्लॉट बुकिंग (Slot Booking) करण्यासाठी पेटीएम (Paytm) ने एक फिचर लॉन्च केले आहे. त्यामुळे युजर्स आता पेटीएमद्वारे देखील लसीचे स्लॉट बुकिंग करु शकतात. पेटीएम युजर्स आता कोविड-19 लसीकरणासाठी (Covid-19 Vaccination) स्लॉट शोधून बुक करु शकतात. कोवॅक्सिन (Covaxin) आणि कोविशिल्ड (Covishield) या दोन्ही लसींसाठी तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्रात बुकींग करता येईल. (Aarogya Setu App वर दिसणार आता COVID-19 Vaccine Status; नवं Blue Tick फीचर देणार माहिती)

"या सेवेमुळे भारतीयांना अगदी सुरळीतपणे लसीकरणासाठी स्लॉट बुकींग करता येईल आणि लस घेऊन इम्युनिटी वाढवता येईल. यामुळे कोरोना संकटाचा सामना करणे शक्य होईल," असे पेटीएमने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

"पेटीएम, मेकमायट्रिप आणि इन्फोसिससह अनेक कंपन्या कोविड-19 लस बुकिंगसाठी मंजुरी शोधत आहेत," असे सरकारच्या डिजिटल प्लॅटफॉर्म कोविन (CoWIN) चे ​​प्रमुख आर. एस. शर्मा यांनी सांगितले. मे महिन्यामध्ये पेटीएमने 'Vaccine Finder' हे नवे फिचर लॉन्च केले होते. यामुळे युजर्संना लसी कोठे कोणती उपलब्ध आहेत, किंमत याची माहिती मिळत होती.

लस बुकींगसाठी  कोविन अॅपसोबत थर्ड पार्टी अॅप्लिकेशन्स संलग्न करण्यासाठी मागील महिन्यात सरकारतर्फे नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या. या गाईडलाईन्सच्या वापरामुळे थर्ड पार्टी अॅप्लिकेशन्स कोविड-19 लसीकरणासाठी स्लॉट बुकिंग सहजरित्या करु शकतात. यापूर्वी इंटरनेट जाएंट्स फेसबुक, गुगल आणि HealthifyMe सारखे स्टार्टअप यांनी लसीचा स्लॉट सहजरित्या बुक करता यावा, यासाठी काही टुल्स सादर केले होते.

कोविड-19 संकटावर मात करण्यासाठी सध्या देशभरात लसीकरण मोहिम सुरु आहे. सरकार टप्प्याटप्प्याने ही मोहिम राबवत असून सुरुवातीला आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर्स त्यानंतर 60 वर्षांवरील ज्येष्ठ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. पुढील टप्प्यात 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु झाले. आता लवकरच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसी देण्यात येणार आहेत.