M- Indicator Update: आता लोकलची अचूक वेळ आणि ठिकाण जाणून घेत प्रवास करा सुकर, जाणून घ्या काय आह नवीन अपडेट
M Indicator (Photo Credits: Twitter, File Image)

लोकलचा (Mumbai Local) प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी एम- इंडिकेटर (M- Indicator) या ऍपचे महत्व अपार आहे. लोकल ट्रेनच्या टाईमटेबल पासून ते तांत्रिक अडचणींच्या वेळी अपडेट्स जाणून घेण्यापर्यंत सर्व गोष्टीत हा ऍप कामी येतो. पण मुंबईतील रेल्वेचे विस्तृत जाळे पाहता अनेकदा लोकलच्या फेऱ्या उशिरानेच असतात, अशा वेळी ट्रेनचे नियोजित वेळापत्रक दाखवणारा हा ऍप निरर्थक ठरतो. ही समस्या लक्षात घेत आता एम- इंडिकेटर तर्फे एक नवे अपडेटेड फीचर सुरु करण्यात आले आहे. यानुसार आता तुम्हाला कोणत्याही वेळी तुमची लोकल नेमकी कुठे आहे आणि तिथून तुमच्या गंतव्य स्थानी पोहचायला किती वेळ लागेल हे तपासता येणार आहे.

या नव्या अपडेट नुसार प्रवासी अचूक वेळेत ट्रेनची माहिती प्राप्त करू शकतात. तसेच ट्रेन उशिराने धावत असल्यास आता नेमकी कुठे आहे आणि किती वेळ उशीर होणार आहे हे देखील प्रवासी जाणून घेऊ शकतात. यापूर्वी ही सुविधा केवळ लांब पल्ल्याच्या एक्प्रेस गाड्यांपुरती मर्यादित होती मात्र आता नियमित लोकलच्या बाबतीतही ही सोय उपलब्ध आहे. (गूगल असिस्टंटच्या मदतीने करता येणार WhatsApp Video आणि Audio कॉल)

पहा फोटो

M Indicator New Update (Photo Credits; Screenshots)

काय आहे नवीन अपडेट

हे अपडेट गूगल मॅप्स प्रमाणे काम करणार आहे, ज्या प्रमाणे, मॅप्सवरून प्रवाशांना ट्रॅफिकचा अंदाज घेता येतो, त्यानुसार ट्रेनची अचूक वेळ जाणून घेता येईल. यापुढे अप्लिकेशन मध्ये आपण नेहमीपसारखेच आपल्याला ज्या स्थानकातून ट्रेन पकडायची आहे ते स्थानक निवडायचे आहे त्यात आपले गंतव्य स्थानक टाकून त्या वेळेत उपलब्ध लोकलचे वेळापत्रक आपल्याला दाखवले जाईल. याशिवाय आपण ट्रेन मध्ये असल्यास त्या क्षणी कुठे आहोत व गंतव्य स्थानी  पोहचायला किती वेळ लागेल हे ही जाणून घेऊ शकाल.

दरम्यान ही सुविधा मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर उपलब्ध आहे, ज्यामुळे यापुढे मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवाशांच्या वेळेचा खोळंबा होणार नाही अशी अपेक्षा आहे. लक्षात घ्या, या सर्व सुविधा आपल्याला ऑनलाईन असल्यास वापरता येणार आहेत त्यामुळे तुमच्या फोन मध्ये इंटरनेट असणे आवश्यक आहे.