Kaun Banega Crorepati च्या नावाखाली WhatsApp Lottery Scam; 25 लाखांचे आमिष दाखवून युजर्सची फसवणूक
KBC & WhatsApp (File Photo)

लोकप्रिय इन्स्टट मेसेजिंग अॅप  व्हॉट्सअॅप (WhatsApp) सध्या हॅकर्सचे (Hackers) लक्ष्य बनले आहे. व्हॉट्सअॅपवरील एक नवा स्कॅम (Scam) समोर येत आहे. 'कौन बनेगा करोडपति' (Kaun Banega Crorepati) च्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळण्याचे काम याद्वारे केले जात आहे. या स्कॅमच्या मागे असणारी टोळी ही परदेशात राहत असून व्हॉट्सअॅपवर कौन बनेगा करोडपतिच्या लॉटरीचा मेसेज (Lottery Message) लोकांना पाठवत आहेत. युजर्संना 25 लाखांची लकी ट्रॉ लॉटरी लागल्याचा मेसेज व्हॉट्सअॅपवर मिळत आहे.

जर तुम्हाला अशा प्रकराचा मेसेज आला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. एका रिपोर्टनुसार, मुंबईच्या मालाड येथील एका रहिवाशाला या स्कॅममध्ये आपले पैसे गमवावे लागले आहेत. या व्यक्तीचे नाव Tarannum Raza असे असून त्याला केबीसीच्या एका मेंबरकडून ऑडिओ मेसेज आला होता. यासोबतच त्याला एका पोस्टरचा फोटो देखील पाठवण्यात आला होता. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा फोटो आणि त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे नाव होते.

WhatsApp Lottery Message (Photo Credits: Hemant Upadhyay Twitter)

हा स्कॅम आहे, याची थोडी देखील कल्पना नसलेल्या रझा यांनी पोस्टरमध्ये दिलेल्या व्हॉट्सअॅप नंबरला कॉल केला. त्यानंतर स्कॅमरने प्रोसेसिंग फी च्या नावाखाली रझा यांच्याकडून 25,000 रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने अजून 45,000 रुपयांची मागणी केली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे रझा यांच्या लक्षात आले.

दरम्यान, सोनी टीव्ही केबीसीच्या नावाखाली कोणाकडूनही पैसे मागत नाही. यामुळे अशा स्कॅम्पना बळी पडू नका, असे आवाहन अमिताभ बच्चन यांनी केबीसीच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये केले.