
भारतातील सर्वात महत्वाचा धार्मिक सोहळा म्हणून कुंभमेळ्याकडे पहिले जाते. दर 12 वर्षांनी भरणारा हा कुंभमेळा यंदा 15 जानेवारी ते 4 मार्च या दरम्यान उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे भरणार आहे. या मेळ्यासाठी जगभरातील भाविक हजेरी लावतात. यावर्षी 12 कोटी भाविक हजेरी लावण्याची शक्यता आहे, त्यानुसार याची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. कुंभमेळ्याचे निमित्त साधून जिओनेही आपले हात धुवून घायायचे ठरवले आहे. यासाठी रिलायंस जिओने (Reliance Jio) नवा ‘कुंभ जिओफोन’ लाँच केला आहे. या फोनची खासियत म्हणजे कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची माहिती या फोनमध्ये देण्यात आली आहे.
जिओने आपला जुनाच फोन, या कुंभमेळ्यासाठी नव्या फीचरसह लाँच केला आहे. यामध्ये कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्या बस, ट्रेन आदींची इत्यंभूत माहिती असेल. याचबरोबर कोणत्या दिवशी कोणते स्नान आहे, विशेष ट्रेन आणि बसेसबाबत रिअल-टाइम माहिती अशा गोष्टीही उपलब्ध आहेत. याशिवाय यामध्ये इमर्जंसी हेल्पलाइन नंबरही देण्यात आले आहेत. (हेही वाचा : अलाहाबाद येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तब्बल 15 हजार कोटी रुपये मंजूर)
कुंभमेळ्यासारख्या मोठ्या कार्यक्रमात जवळचे लोक अथवा नातेवाईक हरवण्याची दाट शक्यता असते. अशावेळी हा जिओफोन तुम्हाला मदत करेल. या फोनमध्ये फॅमिली लोकेटर या नावाचे एक खास फिचर देण्यात आले आहे, ज्याद्वारे तुम्ही हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेऊ शकता. याचसोबत या फोनमधील जिओ टीव्हीद्वारे भाविक मेळ्यातील खास पूजा, कार्यक्रम यांचे व्हिडीओदेखील पाहू शकतात. भक्ती संगीत ऐकण्यासाठी यामध्ये कुंभ रेडिओचाही पर्याय आहे.
हा फोन खास एक्सचेंज ऑफर अंतर्गत फक्त 501 रुपयांना उपलब्ध आहे. तुमच्याकडील कोणत्याही 2 जी/ 3 जी अथवा 4 जी फोनच्या एक्सचेंजमध्ये तुम्ही हा जिओ फोन विकत घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला 594 चा रिचार्ज करणे बंधनकारक आहे. या रिचार्जद्वारे 6 महिन्यासाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा प्राप्त होईल. कुंभ जिओफोनच्या ग्राहकांना कुंभमेळ्या दरम्यान रोज एक प्रश्न विचारला जाईल, याद्वारे आकर्षक बक्षीसेदेखील जिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.