‘पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा’, म्हणजे कुंभमेळा ! दर तीन वर्षांनी एकदा म्हणजे 12 वर्षांत नाशिक, अलाहाबाद, उज्जेन आणि हरिद्वार या ठिकाणी हा मेळा भरतो. पापमुक्त होण्याचा तसेच मनुष्याला जन्म-पुनर्जन्म किंवा मृत्यु-मोक्ष यांच्या चक्रातून मुक्त होण्याचा एक मार्ग म्हणून कुंभमेळ्याकडे पहिले जाते. बारा पूर्ण कुंभमेळ्यांनंतर तब्बल 144 वर्षांनंतर अलाहाबाद येथे महाकुंभमेळा भरतो. आगामी 2019च्या या कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झाल्या असून, हा कुंभमेळा उत्तरप्रदेशमधील अलाहाबाद येथे होणार आहे.
2019 कुंभमेळ्यातील शाहीस्नान -
14-15 जानेवारी 2019 : मकर संक्रांती (पहिले शाही स्नान)
21 जानेवारी 2019 : पौष पोर्णिमा
31 जानेवारी 2019 : पौष एकादशी स्नान
04 फेब्रुवारी 2019 : मौनी अमावस्या (मुख्य शाही स्नान, दुसरे शाही स्नान)
10 फेब्रुवारी 2019 : वसंत पंचमी (तीसरे शाही स्नान)
16 फेब्रुवारी 2019 : माघी एकादशी
19 फेब्रुवारी 2019 : माघी पोर्णिमा
04 मार्च 2019 : महाशिवरात्री
2019च्या कुंभमेळ्याचा मान उत्तरप्रदेशला मिळाल्याने, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जातीने सर्व तयारी पाहत आहेत. नुकतेच त्यांनी कुंभमेळ्याच्या तयारीची माहिती पत्रकार परिषदेत दिली, 30 नोव्हेंबरपर्यंत सर्व तयारी पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.
हा कुंभमेळा 3200 हेक्टर क्षेत्रात भरला जाणार असून, या कुंभमेळ्यासाठी तब्बल 15 हजार कोटी रुपयांच्या 443 योजनांना मंजूरी देण्यात आली आहे. कुंभमेळाव्यातील कामाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. त्या संदर्भात त्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. कुंभमेळ्यासाठी 1 लाख 22 हजार शौचालये तयार केली जाणार आहेत. देशातील 6 लाख गावांमधून येणाऱ्या भाविकांसाठी, तसेच 192 देशांतून येणाऱ्या पर्यटकांसाठी टेंट सिटी वसवली जाणार आहे. या वर्षीच्या कुंभमेळ्याची वेबसाईटदेखील बनवली जात असून, लोगोमार्फत स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याआधीच अलाहाबाद शहराचे नामकरण प्रयागराज होण्यासाठी सरकारकडून वेगानं पावलं उचलली जात आहेत. कुंभमेळ्याच्या प्राधिकरणाचे नाव यापूर्वीच प्रयागराज झाले आहे. त्यामुळे आता लवकरच अलाहाबाद जिल्ह्याचे नावही प्रयागराज होईल. अंतराळातून पृथ्वीवरील दिसणारा एकमेव प्रसंग म्हणून कुंभमेळ्याकडे पहिले जाते. त्यामुळे 2019चा कुंभमेळादेखील राजकारणाच्या आणि समाजकारणाच्यादृष्टीने महत्वाचा ठरणार आहे यात शंका नाही.