IBM Layoffs: टेक कंपन्यांमधील कर्मचारी कपात थांबता थांबेना! IBM ने 3900 कर्मचाऱ्यांना टाकलं कामावरून काढून
IBM (PC - Twitter)

IBM Layoffs: एकापाठोपाठ एक मोठ्या टेक कंपन्या टाळेबंदीची (Layoffs) घोषणा करत आहेत. सर्च इंजिन गुगलने (Search Engine Google) गेल्या आठवड्यात नोकऱ्या कपातीची घोषणा केली होती. आता टेक कंपनी IBM कडूनही कर्मचारी कपातीची बातमी समोर येत आहे. IBM कंपनीने सुमारे 3900 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. गेल्या बुधवारी, IBM कॉर्पोरेशनने नोकरीच्या कपातीची माहिती दिली होती. मात्र, कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे कारणही कंपनीने दिले आहे.

कंपनीने म्हटलं आहे की, यावेळी कंपनी आपले वार्षिक रोख लक्ष्य पूर्ण करू शकली नाही, एवढेच नाही तर चौथ्या तिमाहीत आपले लक्ष्य महसूल साध्य करण्यातही कंपनी मागे पडली. (हेही वाचा -Spotify Layoffs: टेक कंपनी खर्च कमी करण्यासाठी या आठवड्यात कामगारांना काढून टाकण्याची योजना आखत आहे)

एका अहवालानुसार, बुधवारी कंपनीचे सीएफओ जेम्स कॅव्हनॉफ यांनी सांगितले की, कर्मचार्‍यांच्या कपातीनंतरही कंपनी भरती प्रक्रिया सुरू ठेवेल. याशिवाय, कंपनीने सांगितले आहे की ले-ऑफमुळे, जानेवारी ते मार्च कालावधीसाठी $ 300 दशलक्ष चार्ज देखील भरावा लागेल. कंपनीच्या शेअर्समध्येही 2 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

वास्तविक, आयबीएमपूर्वी गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटरसारख्या कंपन्यांनी मोठी कर्मचारी कपात केली आहे. मात्र, यातील बहुतांश कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचे कारण आर्थिक मंदीची भीती असल्याचे सांगितले आहे. (हेही वाचा - Google Alphabet Layoffs: Google ची मूळ कंपनी Alphabet जगभरातील 12 हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ)

दरम्यान, टेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची प्रक्रिया गेल्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यातच सुरू झाली होती. एका अहवालानुसार, आता टेक कंपन्यांमधील सुमारे 1.50 लाख कर्मचाऱ्यांना या कर्मचारी टाळेबंदावर प्रक्रियेतून जावे लागेल.