Gras Mahakosh Maharashtra: सर्व प्रकारचे कर, करेत्तर रकमा जमा करण्यासाठी New Mobile App, जाणून घ्या फायदे
Gras Mahakosh Maharashtra (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही विभागाशी संबंधित करदाते, इतर संस्था, शासकीय कार्यालये तसेच सर्वसामान्य नागरिकांना शासन खाती रक्कम जमा करणे सोपे झाले आहे. संचालनालय, लेखा व कोषागारे, मुंबई यांनी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे (NIC) यांच्यामार्फत विकसित केलेल्या महसूली कर व करेतर रकमा भरण्याची सुविधा देणारे, ‘Gras Mahakosh Maharashtra’ या अँड्रॉइड मोबाइल अ‍ॅपचे वित्त विभाग, अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या हस्ते 4 फेब्रुवारी रोजी उद्घाटन करण्यात आले.

संचालक, लेखा व कोषागारे श्री.ज.र.मेनन यांनी सर्व नागरिकांनी सर्व प्रकारच्या कर व करेतर रकमा जमा करण्यासाठी या मोबाईल ॲपचा तसेच इतर सर्व सुविधांचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन केलेले आहे. हे ॲप GRAS वेबसाईट व गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. NIC SCIENTIFIC OFFICER बालकृष्ण नायर व त्यांचे सहयोगी विशाल नळदुर्गकर यांचा ॲप विकसित करण्यात मोलाचा वाटा आहे. देयकांचे आदान-प्रदान, कर व करेतर रकमा व इतर बहुतांशी कामकाज ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत असलेल्या संचालनालय, लेखा व कोषागारे या विभागात GRAS मोबाईल अॅपचे विकसन हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. (हेही वाचा: QR Code स्कॅन करुन पेमेंट करत असाल, तर 'या' गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान)

यावेळी नवीन निवृत्ती वेतनधारकांना त्वरित PRAN क्रमांक व PRAN कार्ड ऑनलाईन मिळण्याकरिता ONLINE PRAN GENERATION MODULE (OPGM) हे सेवार्थ प्रणालीसोबत संलग्न करण्यात आले. सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयातील विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, नियंत्रक अधिकारी तथा आहरण व संवितरण अधिकारी यांना, तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करण्यासाठी उपयुक्त ठरेल.