सोशल मिडीया नेटवर्क गुगल प्लस (google+)ला बंद करण्याचा मोठा निर्णय गुगलने घेतला आहे. पाच लाख युजर्सच्या माहितीचा विचार करूनच गुगलकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. गुगल प्लस बंद होणार असल्याची अधिकृत सूचना 8 ऑक्टोबरला रात्री करण्यात आली. या बातमीमुळे साहजिकच गुगल प्लस वापरकर्त्यांना धक्का बसला आहे. 28 जून 2011ला गुगल प्लस ही साईट सुरू करण्यात आली होती. मात्र फेसबुकच्या तुलनेत या साईटला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. तरी तब्बल 7 वर्षे ही साईट चालू होती.
काही दिवसांपूर्वी फेसबुकवरून लोकांची वैयक्तिक माहिती चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. याच धर्तीवर एका विशिष्ट बगद्वारे पाच लाख गुगल प्लसच्या युजर्सच्या खात्यामधून माहिती लीक झाली होती. 2015 या माहितीची चोरी चालू होती. मात्र गुगल प्लस बंद करण्यापूर्वी हा बग काढून टाकण्यात आल्याची माहिती गुगलने दिली आहे. फेसबुकला टक्कर देण्यासाठी गुगलने गुगल + लॉंच केले होते, मात्र आता या स्पर्धेत गुगल प्लस पूर्णतः असफल ठरल्याचे दिसून येत आहे.
अमेरिकेतील एका दिग्गज इंटरनेट कंपनीने गुगल प्लस युजर्ससाठी हा सुर्यास्त असल्याचे म्हटले आहे. गुगल प्लसची निर्मिती करण्यापासून ते लोकांपर्यंत पोहचवण्यापर्यंत अनेक आव्हानाचा सामना करावा लागला. मात्र युजर्सची माहिती सुरक्षित ठेवण्यास गुगल कुचकामी ठरले.