गुगल पे 'Nearby Spot' फिचर आता भारतातील 35 शहरांमध्ये उपलब्ध; जवळची अत्यावश्यक सेवांची दुकाने दाखवून करणार युजर्सची मदत
Google Pay (Photo Credits: Twitter)

डिजिटल पेमेंट अॅप गुगल पे (Google Pay) आता तुमच्या जवळची दुकाने दाखवणार आहे. गुगल पे चे 'Nearby Spot' हे फिचर लॉन्च करण्यात आल्याची घोषणा कंपनीने बुधवारी (27 मे) केली. त्यानंतर आता भारतातील 35 शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे. सध्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) धोका असल्यामुळे सोशल डिस्टसिंगचे (Social Distancing) पालन करणे आवश्यक आहे. तसंच लॉकडाऊनमुळे (Lockdown) दुकाने काही ठराविक वेळासाठी सुरु असतात. त्यामुळे तुमच्या परिसरात कोणत्या ठिकाणी अत्यावश्यक सेवांची दुकाने आहेत तसंच ती किती वेळ सुरु आहेत, हे दाखवण्यासाठी गुगल पे मदत करणार आहे. (Paytm आणि Google Pay च्या माध्यमातून होतेय नागरिकांची फसवणूक, तुम्ही सावधगिरी बाळगा)

गेल्या महिन्यात हे फिचर काही शहरांतच लॉन्च करण्यात आले होते.  या फिचर द्वारे युजर्स जवळपासच्या परिसरातील अत्यावश्यक सेवा देणारी कोणती दुकाने सुरु आहेत, हे पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे दुकानादारांसाठीही खास सुविधा या नव्या फिचरमध्ये देण्यात आल्या आहेत. यात दुकानदार त्यांच्या दुकानाची वेळ, दुकानात अत्यावश्यक वस्तूंचा साठा आहे का तसंच दुकानामध्ये सोशल डिस्टसिंगचे पालन केले जाते का, यांसारख्या गोष्टींची माहिती देऊ शकतात.

तसंच देशभरातील सर्व  गुगल पे युजर्स गॅस सिलेंडर अॅपद्वारे बुक करु शकतात. एचपी गॅस (HP Gas), भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) आणि इन्डेन (Indane) कंपनीचे गॅस सिलेंडर ऑनलाईन बुक करुन अॅपद्वारे पेमेंट करु शकतात. त्याचबरोबर या अॅपमध्ये 'Coronavirus Spot' असेही एक फिचर देण्यात आले आहे. त्याद्वारे युजर्स आरोग्य मंत्रालयाने जारी केलेली सुरक्षा नियमावली पाहु शकतात. तसंच मदत करणाऱ्या अनेक संस्थांना दान करण्यासाठी तेथे लिंक्स देण्यात आल्या आहेत. या तिन्हीही सेवा सर्व गुगल पे युजर्ससाठी उपलब्ध आहेत, असा दावा कंपनीने निवेदनात केला आहे.