तुम्हीही सर्दी (Cold), खोकला आणि तापाच्या बहाण्याने तुमच्या ऑफिसमधून वारंवार सुट्टी घेत असाल, तर सावध व्हा. कारण आता असे करणे तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. संशोधकांनी एक असे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) विकसित केले आहे, जे तुमच्या आवाजावरून सांगू शकेल की तुम्ही आजारी आहात की नाही. त्यामुळे आजारपणाचे खोटे कारण सांगून तुम्ही ऑफिसमधून सुट्टी घेतली तर त्याचा फटका तुम्हाला सहन करावा लागू शकतो.
सुरतमधील सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि जर्मनीच्या रेनिश युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सच्या संशोधकांनी आवाजाद्वारे आजार शोधण्याची पद्धत विकसित केली आहे. अभ्यासामध्ये लोकांना सर्दी झाली आहे की नाही, हे शोधण्यासाठी हार्मोनिक्सचा वापर करण्यात आला. संशोधकांनी 630 लोकांच्या आवाजाच्या पद्धतीचा अभ्यास केला. या 630 लोकांनी त्यांना सर्दी आणि खोकला असल्याचे सांगितले होते, परंतु, संशोधनानंतर केवळ 111 लोकांना सर्दी असल्याचे आढळून आले.
एखाद्या व्यक्तीला खरच सर्दी झाली आहे की नाही हे ओळखण्यासाठी त्याच्या पद्धतींचे विश्लेषण केले गेले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सर्दी झालेल्या आणि न झालेल्या व्यक्तीच्या आवाजामधील फरक ओळखू शकतो का नाही, हे विश्लेषणातून दिसून आले. ‘द इकॉनॉमिस्ट’ने सांगितले की, या अभ्यासामधील स्वयंसेवकांना 1 ते 40 पर्यंत मोजण्यास सांगितले गेले आणि नंतर त्यांनी आठवड्याच्या शेवटी काय केले याचा अहवाल देण्यास सांगितले. त्यानंतर संशोधनात सुमारे 70% अचूकता दिसून आली. या अभ्यासाचा उद्देश सर्दी झालेल्या व्यक्तीची ओळख पटवणारी पद्धत विकसित करणे हा होता. (हेही वाचा: आर्टिफिशियल इंटेलिजन्स करू शकतो तुमचा पासवर्ड क्रॅक; जाणून घ्या डिव्हाइस आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी काय कराल)
आता एआयच्या मदतीने सर्दी आणि तापाच्या बहाण्याने रजा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती मिळवणे शक्य होणार आहे. संशोधकांच्या मते, हे फिचर लोकांना व्हायरल इन्फेक्शनचा प्रसार रोखण्यास मदत करू शकते. कर्मचारी कार्यालयातून सुट्टी घेण्यासाठी सर्दी, ताप, मस्कुलोस्केलेटल समस्या (जसे की पाठदुखी) आणि मानसिक थकवा यांसारखी कारणे देतात. परंतु आता एआयच्या मदतीने तुमच्या बॉसला कळेल की तुम्ही खोटे बोलत आहात की नाही.