प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook//UIDAI)

देशातील भारतीयांची ओळख निर्माण करणाऱ्या आधार कार्डने (The unique Identification Authority of India (UIDAI) गेल्या 9 वर्षांत नवा विक्रम केला आहे. केंद्र सरकारने 2010 मध्ये सर्व नागरिकांना आपली ओळख पटवून देण्यासाठी आधार कार्ड लागू केले होते. देशातील 125 कोटी नागरिकांनी आतापर्यंत आधार कार्डची नोंदणी केली आहे. 2018 मध्ये सर्व सरकारी कामांसाठी तसेच योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. सर्व ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य असल्यामुळे सरकारला आधार नोंदणी करण्यात यश मिळालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आधार कार्डकडे दररोज सुमारे 3 कोटी 'ऑथेन्टिकेशन रिक्वेस्ट' म्हणजे पडताळणी विनंत्या येतात. तसेच नागरिक आपले आधार कार्ड नेहमी अपडेट करत असतात. UIDAI ने आतापर्यंत सुमारे 331 कोटी आधार कार्डांमध्ये बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक अपडेट केले आहे. तसेच UIDAI कडे दररोज तीन ते चार लाख अर्ज अपडेट करण्यासाठी येतात. (हेही वाचा - PAN-Aadhar Link: 31 डिसेंबरपर्यंत पॅनकार्ड आधारकार्डसोबत लिंक करा; अन्यथा होईल मोठं नुकसान)

2010 मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली गावातील एका महिलेला पहिले 12 अंकी क्रमांकाचे आधार कार्ड देण्यात आले होते. सध्या सरकारच्या अनेक कार्यक्रमासाठी आधारकार्ड महत्त्वाचे कागदपत्र म्हणून गृहित धरले जाते. सरकारने आता आधार कार्ड-पॅनकार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. तसेच येत्या 31 डिसेंबरला आधार-पॅन लिंक न केल्यास पॅनकार्ड अवैध ठरणार असल्याचंही केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.