Mukesh Ambani | Reliance Jio | Image Used For Representational Purpose Only | (Photo Credits: File Photo)

व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलनंतर रिलायन्स जिओनेही (Reliance Jio) दर (Mobile Services Rates) वाढवण्याची घोषणा केली आहे. 6 डिसेंबरपासून, जिओ कंपनी ऑल इन वन प्लान्स दर 40% पर्यंत वाढवणार आहे. जिओकडून व्होडाफोन आणि एअरटेलच्या नवीन दर योजना जाहीर झाल्यावर ही घोषणा करण्यात आली आहे. 6 डिसेंबरपासून जिओचे प्लान्स महागणार आहेत. दुसरीकडे एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया 3 डिसेंबरपासून आपले नवे प्लान्स सादर करणार आहेत. जिओने एक निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे.

जिओने आपल्या प्लान्सच्या किंमती जरी वाढवल्या असल्या तरी, त्याबदल्यात कंपनी नवीन प्लान्सद्वारे वापरकर्त्यांना 300% अधिक लाभ देणार आहे. जिओची ऑल इन वन योजना एफओपी मर्यादेसह येते. व्होडाफोन आयडियाने मोबाइल सेवेमध्ये 42 टक्क्यांपर्यंत आणि एअरटेलने 50.10 टक्क्यांपर्यंत वाढ कली आहे. हे नवे दर 3 डिसेंबरपासून लागू होतील. किंमत वाढविण्याच्या घोषणेसह, व्होडाफोन आयडियाने अन​लिमिटेड कॅटेगरीमध्ये दोन दिवस, 28 दिवस, 84 दिवस आणि 365 दिवसांच्या वैधतेसह नवीन योजना देखील जाहीर केल्या आहेत.

(हेही वाचा: येत्या 1 डिसेंबर पासून मोबाईलवर बोलणे होणार महाग, जाणून घ्या किती रुपयांनी वाढणार टॅरिफ प्लॅन)

टेलिकॉम टॉकच्या अहवालानुसार,  दर वाढीनंतर व्होडाफोन-आयडियाचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान हा 19 रुपयांचा असणार आहे. यासह आता कंपनीने अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी एफयूपी मर्यादा निश्चित केली आहे. आता जिओच्या 222, 333 आणि 444 रुपयांच्या नवीन प्लान्समध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, एसएमएस आणि अधिक डेटा देण्यात येत आहे. कंपनीने दावा केला आहे की, बाजारपेठेत अपलाब्ध असलेल्या अन्य कंपन्यांच्या तुलनेत हा दर 20 ते 50 टक्के स्वस्त आहे. कंपनी 1 महिन्यासाठी 111 रुपयांवर अपग्रेड करण्याची सुविधादेखील देत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, आपल्या बेस प्लानवर 111 रुपये अतिरिक्त दिल्यास, 1 महिन्यांची अतिरिक्त सेवा मिळू शकते. दरम्यान, व्होडाफोन आयडिया, एअरटेल आणि जिओ या तीन कंपन्यांचे एकत्रितपणे सुमारे 100 कोटी ग्राहक आहेत.