Apple Stores in India: आयफोन कंपनी अॅपल भारतामध्ये उघडणार आणखी 3 स्टोअर्स; मुंबईमध्ये सुरु होणार नवी दोन दुकाने, जाणून घ्या सविस्तर
Apple (Apple / Twitter)

प्रीमियम आणि महागड्या उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेल्या अॅपल (Apple) कंपनीने एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात भारतात दोन स्टोअर उघडले. अॅपलने भारतातील पहिले अधिकृत स्टोअर मुंबईत उघडले आणि दोन दिवसांनी दिल्लीत दुसरे स्टोअर उघडले. या दोन स्टोअरमधून कंपनीने पहिल्याच महिन्यात मोठा नफा कमावला आहे. एका अहवालानुसार, कंपनीने भारतातील अॅपल स्टोअर्समधून पहिल्या महिन्यात सुमारे 50 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. भारतात अॅपल स्टोअर उघडण्याचा निर्णय आता कंपनीसाठी फायदेशीर करार ठरत आहे.

दुसरीकडे, एक रिपोर्ट समोर आला आहे ज्यामध्ये असे म्हटले जात आहे की अॅपल आता भारतात 3 नवीन स्टोअर उघडण्याच्या तयारीत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अॅपल येत्या चार वर्षांत जगभरातील विविध देशांमध्ये सुमारे 53 नवीन स्टोअर उघडणार आहे. कंपनी आशियातील आपल्या स्टोअरची संख्या वाढवणार आहे.

स्मार्टफोनसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे कंपनी भारतात 3 नवीन अॅपल स्टोअर उघडण्याचा विचार करत आहे. रिपोर्ट्सनुसार, अॅपलचे हे तीन स्टोअर्स फक्त दिल्ली आणि मुंबईतच सुरू होतील. भारतात नव्याने उघडणाऱ्या तिन्ही अॅपल स्टोअर्सचे लोकेशनही अहवालात उघड करण्यात आले आहे. असे सांगितले जात आहे की, अॅपल भारतात तिसरे स्टोअर बोरिवली-मुंबई येथे उघडणार आहे. त्यानंतर 2026 मध्ये दिल्लीच्या डीएलएफ मॉलमध्ये चौथे अॅपल स्टोअर उघडेल. रिपोर्टनुसार, हे भारतातील दुसरे सर्वात मोठे अॅपल स्टोअर असेल. पाचवे अॅपल स्टोअर 2027 मध्ये वरळी, मुंबई येथे उघडेल. (हेही वाचा: फॉक्सकॉन बेंगळुरू येथे सुरु करणार नवीन iPhone चे उत्पादन; तब्बल 50,000 लोकांना मिळणार रोजगार, जाणून घ्या सविस्तर)

अशाप्रकारे अॅपल 2025 ते 2027 या काळात भारतात दरवर्षी नवीन स्टोअर उघडेल. दरम्यान, सध्या भारतात सुरु असलेल्या अॅपलचे दोन्ही स्टोअर कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी उघडले होते. अॅपलला भारतातील दोन्ही स्टोअर्सचा खूप फायदा झाला आहे. कोणत्याही सणासुदीच्या हंगामाशिवाय, दोन्ही दुकानांनी एकाच महिन्यात प्रत्येकी सुमारे 25 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. कंपनीची ही कमाई भारतातील कोणत्याही इलेक्ट्रॉनिक रिटेल स्टोअरपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. स्टोअरमध्ये विक्री अशीच सुरू राहिल्यास कंपनी एका वर्षात सुमारे 600 कोटी रुपयांची उत्पादने विकेल.