गेल्या अनेक महिन्यांपासून जगभरातील मोठ-मोठ्या कंपन्या नोकर कपात करत आहेत. अनेक देशांमध्ये मंदीचे सावट असताना आता, अॅपल (Apple) ने भारतातील रिटेल स्टोअर्ससाठी कामगारांची भरती सुरू केली आहे. कंपनी देशभरात स्टोअर्स उघडण्याची तयारी करत आहे, त्यामुळे त्यांनी देशात काही पदांसाठी भरती करण्याची योजना आखली आहे. फायनान्शियल टाइम्सच्या वृत्ताचा हवाला देत ब्लूमबर्गने ही माहिती दिली आहे. कंपनीच्या करिअर पेजवर भारतातील कामगारांसाठी विविध पदांचा उल्लेख केला आहे.
यामध्ये बिझनेस एक्सपर्ट, जिनियस, ऑपरेशन एक्सपर्ट आणि टेक्निकल स्पेशलिस्ट यांचा समावेश आहे. अशाप्रकारे अॅपलने आपल्या वेबसाइटवर सध्या भारतातील कंपनीसाठी शेकडो रिक्त पदांची माहिती दिली आहे. याशिवाय, शनिवारी देशातील मुंबई आणि नवी दिल्ली सारख्या शहरांसाठी काही रिटेल जॉब्जची माहिती पोस्ट करण्यात आली आहे. ब्लूमबर्गच्या मते, जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या स्मार्टफोन बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारतात रिटेल स्टोअर्स सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.
जरी कंपनीने 2020 मध्ये ऑनलाइन थेट विक्री सुरू केली असली तरी, स्वतःचे ब्रिक एंड मोर्टार स्टोअर उघडण्याची त्यांची योजना प्रत्यक्षात आली नाही. यापूर्वी, Apple Inc ने कंपनीच्या विविधीकरण धोरणाचा भाग म्हणून भारतात उत्पादन सुरू करण्याची योजना जाहीर केली होती. या अंतर्गत, ते भारतात आपल्या नवीन iPhone 14 मालिकेतील काही मॉडेल्सचे उत्पादन सुरू करणार आहे. (हेही वाचा: Twitter Layoffs: पुन्हा एकदा ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना नारळ, ट्विटरमधील ‘या’ विशिष्ट विभागातील कर्मचाऱ्यांची नोकरकपात)
चेन्नईतील फॉक्सकॉन युनिटने गेल्या वर्षी सप्टेंबरपासून भारतीय बाजारपेठेसाठी iPhone 14 मालिकेतील स्मार्टफोन असेंबल करण्यास सुरुवात केली आहे. सध्या, देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी फॉक्सकॉनच्या भागीदारीत भारतात 80 टक्के iPhones तयार केले जात आहेत. दरम्यान, अलीकडेच, कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की चीनमधील आयफोन प्लांटचे काम सामान्य पातळीवर पोहोचले आहे. डिसेंबर महिन्यात कंपनीच्या उत्पन्नात वार्षिक आधारावर सुमारे 12.3% ने घट झाली आहे.