क्रिकेट विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) मध्ये भारताच्या विजयासाठी खूप प्रार्थना करण्यात आल्या मात्र ज्या अयशस्वी ठरल्या. ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा पराभव करत सहाव्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. यासह विश्वचषक ट्रॉफी ऑस्ट्रेलियाच्या खात्यात गेली. सलग 10 सामने जिंकल्यानंतर, फायनलमध्ये जाणे आणि पराभवाचा सामना करणे ही क्रिकेटप्रेमींना कधीही न भरणारी जखम आहे. या पराभवाच्या दु:खातून लोक सावरले नव्हते की, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मिचेल मार्शने विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेवत नव्या वादाला जन्म दिला आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा खेळाडू मिचेल मार्श क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर ट्रॉफीवर पाय ठेवत असल्याच्या व्हायरल फोटोवरून वाद चांगलाच वाढू लागला आहे. याबाबत 21 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक सेनेचे अध्यक्ष पं. केशव देव यांनी दिल्लीगेट पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच आवश्यक कारवाईसाठी पंतप्रधान आणि क्रीडामंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले आहे.
पंडित केशव देव यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इंटरनेटच्या माध्यमातून त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो पाहिला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल मार्श विश्वचषक ट्रॉफीवर पा ठेवताना दिसला. यामुळे देशातील 140 कोटी जनतेच्या सन्मानाला धक्का बसला आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रॉफी देऊन गौरव केला. मात्र त्यानंतर मिशेल त्यावर पाय ठेऊन ट्रॉफीचा अपमान केला. (हेही वाचा: FIFA World Cup 2026 Qualifier: फुटबॉल विश्वचषकाच्या क्वॉलिफायर सामन्यात भारताचा कतारकडून 3-0 ने पराभव)
आता मिशेलविरुद्ध दिल्ली गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्याच्या भारतासोबतच्या सामन्यावर आजीवन बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे. त्याची प्रत पंतप्रधान आणि क्रीडामंत्र्यांनाही पाठवण्यात आली आहे.