भारतीय संघ आगामी वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यासाठी अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये दाखल झाला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय दौऱ्याची सुरुवात 1 ऑगस्टपासून होणार आहे. भारत (India) आणि वेस्ट इंडिज संघात 3 टी-20, 3 वनडे आणि 2 टेस्ट सामन्याची मालिका खेळली जाणार आहे. यासाठी भारतीय संघाने सराव करण्यास देखील सुरुवात केली आहे. सराव सत्रात टीम इंडिया फुटबॉल खेळताना दिसली. शिवाय त्यांनी क्षेत्ररक्षणाचा देखील सराव केला. सराव सत्रादरम्यान स्टेडियममध्ये बरेच चाहते देखील उपस्थित होते. यात भारतीय मूळच्या चाहत्यांची संख्या जास्त होती. ('मी फक्त टीम इंडियासाठी नाही तर देशासाठी मैदानात उतरतो', वेस्ट इंडिज मालिकाआधी रोहित शर्मा याचे प्रेरणादायी Tweet)
सराव सत्रानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडून चाहत्यांना एक ट्रीट मिळाली. चाहत्यांनी विराटकडून ऑटोग्राफ मागितले आणि टीम इंडियाच्या रन -मशीनने देखील त्यांना निराश केले नाही. सराव सत्रातुन थोडा वेळ काढत विराट चाहत्यांना भेटला. त्यांना ऑटोग्राफ दिले सोबतच काही चिमुकल्यांसह फोटोज देखील काढले. पहा हा व्हिडिओ:
दरम्यान, विश्वचषकनंतर भारतीय संघात विराट आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या दोन गट पडल्याचे बोलले जात होते. मात्र, विंडीज दौऱ्यासाठी निघण्याआधी विराटने पत्रकारपरिषदेत या वृत्ताचे खंडन केले. विराटने सांगितले की संघातील वातावरण आणि रोहित सोबतच्या त्याच्या वादाचे वृत्त अतिशय चुकीचे आहे. आणि जर असे काही असते तर संघ विश्वचषकमध्ये इतकी चांगली कामगिरी करूच शकला नास्ता. पुढे विराटने पत्रकारांना ड्रेसिंग रुममध्ये येण्यास देखील सांगितले. दुसरीकडे, विराटला चीअर करण्यासाठी भारतीय कर्णधाराची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) देखील संघाबरोबर प्रवास करत आहे. विराट आणि अनुष्का यांचे मियामीमधील काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात दोघे एका हॉटेलमध्ये चाहत्यांसोबत दिसताहेत.