
विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात टीम इंडिया सातत्याने नवीन उंची गाठत आहे. भारतीय संघाचा कर्णधार कोहलीने क्रिकेट मैदानावर फलंदाजी करून अनेक विक्रम नोंदवले आहेत आणि आता मैदानाबाहेरील त्याच्या कमाईने एक नवा दर्जा मिळविला आहे. डफ आणि फेलप्स ब्रँड व्हॅल्युएशनच्या अभ्यासानुसार, सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूच्या (Celebrity Brand Value) बाबतीत कॅप्टन कोहली भारतात आघाडीवर असून त्याने सलग तिसऱ्यांदा या यादीत पहिले स्थान मिळवले आहे. विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू 237.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 1,691 कोटींवर पोहोचली आहे. या प्रकरणात त्याने बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यासह अनेक नामवंतांना मागे ठेवले आहे. (IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज, विराट कोहली याला 'या' 2 दिग्गज खेळाडूंचा रेकॉर्ड मोडण्याची संधी)
भारतीय क्रिकेटपटूंबद्दल बोलायचे झाले तर कोहलीनंतर माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत दुसर्या क्रमांकावर आहे. विशेष बाब म्हणजे धोनीने मागील वर्षी जुलैपासून कोणताही सामना खेळला नाही. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर (25.1 दशलक्ष यूएस डॉलर) आणि चौथ्या क्रमांकावर टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) (23.0 दशलक्ष यूएस डॉलर) आहे. या यादीनुसार रोहित विराटच्या 10 पट मागे आहे. त्यांच्या अभ्यासानुसार कोहलीची ब्रँड व्हॅल्यू 39% ने वाढून 237.5 दशलक्ष यूएस डॉलर्सवर पोचली.
दरम्यान, भारतीय सेलिब्रिटींच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये विराट अव्वल, तर चित्रपट अभिनेता अक्षय कुमार दुसर्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या स्थानावर दीपिका पदुकोन, तर चौथ्या स्थानावर रणवीर सिंह आहे. पाचव्यावर शाहरुख आणि सहाव्यावर सलमान खान आहे.