
वर्षाच्या पहिल्या विदेशी टी-20 मालिकेत प्रभावी कामगिरीनंतर टीम इंडिया (India) आता न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) वनडे मालिकेसाठी सज्ज होत आहे. दोन्ही संघात 5 फेब्रुवारीपासून 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. या मालिकेआधी दोन्ही टीम्सना मोठे झटके लागले आहे. रोहित शर्मा याला पाचव्या टी-20 दरम्यान पोटरीला दुखापत झाली तर, किवी कर्णधार केन विल्यमसन यालाही दुखापत झाल्याने त्याला पहिल्या दोन सामन्यांना मुकावे लागणार आहे. दुसरीकडे, मालिकेच्या पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) कडे दोन दिग्गज खेळाडूंचे रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. विराट सतत विक्रम नोंदवित आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात तो एक नाही तर दोन रेकॉर्ड मोडताना दिसू शकतो.
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात कोहलीकडे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा (Ricky Ponting) मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. कर्णधार म्हणून कोहली पॉटिंगला मागे टाकत सर्वाधिक शतकांची नोंद करू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पॉन्टिंग आणि कोहलीने सर्वाधिक 41-41 शतकं ठोकली आहेत. दुसरीकडे, न्यूझीलंडविरुद्ध कोहलीने 23 वनडे सामन्यांत 1,303 धावा केल्या आहेत. पहिल्या वनडे सामन्यात 61 धावा करून तो श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान (1,308), महेला जयवर्धने (1,326) आणि ऑस्ट्रेलियाचा मार्क वॉ (1,362) यांना मागे टाकत न्यूझीलंडविरुद्ध वनडे सामन्यात सहावा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. शिवाय, वनडे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून कोहलीने आजवर 86 सामन्यात 5,072 धावा केल्या आहेत. पहिल्या वनडे सामन्यात 33 धावा करत कोहली माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना मागे टाकू शकतो आणि वनडेमध्ये कर्णधार म्हणून भारताचा सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज बानू शकतो. कर्णधार म्हणून भारताकडून एकदिवसीय सामन्यात एमएस धोनीने सर्वाधिक 6,641 धावा केल्या आहेत.
भारतीय संघ 5 फेब्रुवारी रोजी हॅमिल्टनच्या सीडेन पार्क येथे 3 सामन्यांच्या वनडे मालिकेचा पहिला सामना खेळणार आहे. विराट सेना मालिकेचा पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल.