भारतीय खेळाडू (फाईल फोटो- photo credit : Getty)

एडलेड येथे रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 31 धावांनी मात करून 1-0 अशी आघाडी घेतली. भारताने हा सामना जिंकत फक्त आघाडीच घेतली नाही तर अनके विक्रमदेखील मोडले आहेत. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रंगलेल्या या सामन्यात तब्बल 70 वर्षानंतर भारताने ऑस्ट्रेलियाच्या त्यांच्याच भूमीत पहिला सामना जिंकत इतिहास रचला आहे. भारताने ऑस्ट्रेलियात आतापर्यंत 11 कसोटी मालिका खेळल्या आहेत. यापैकी 9 पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. याबरोबरच तब्बल 10 वर्षानंतर भारताने ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकला आहे. भारताने 2008 साली ऑस्ट्रेलियात शेवटचा कसोटी सामना जिंकला होता.

विराट कोहलीने या मालिकेत सर्वात जलद हजार धाव पूर्ण करण्याचा रेकॉर्ड केला आहे. 59.05 च्या सरासरीने हजार धाव करत त्याने सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण यांना मागे टाकले आहे.

39 वर्षांत पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत हरवण्याचा विक्रम कोणी केला नव्हता. 1979 मध्ये पाकिस्तानने ही कामगिरी केली होती, त्यानंतर आता भारताने हा विक्रम केला आहे.

क्रिकेटमध्ये सर्वाधिक कॅच घेणाऱ्या संघ जिकंतो असे म्हटले जाते. या खेळल्या गेलेल्या सामन्यात एकूण 35 कॅच घेतल्या गेल्या. एका टेस्ट मॅचमध्ये सर्वाधिक कॅच घेण्याचाही हा स्वतंत्र रेकॉर्ड आहे. याआधी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात केपटाऊनमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात एकूण 34 कॅच घेतल्या गेल्या होत्या. 1992 मध्ये पर्थच्या मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या सामन्यात एकूण 33 कॅच घेतल्या गेल्या.

चेतेश्वर पुजाराने सामन्यात चांगली कामगिरी केल्याबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने सामन्यात पहिल्या डावात 123 धावा आणि दुसऱ्या डावात 71 धावा केल्या.