RR vs MI Head to Head: मुंबई इंडियन्ससमोर आज राजस्थानचे 'रॉयल' आव्हान, जाणून घ्या दोन्ही संघांची हेड टू हेड आकडेवारी
RR vs MI (Photo Credit - X)

मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये आज आयपीएलमधील साखळी फेरीची लढत रंगणार आहे. राजस्थानचा संघ सहा विजय आणि 12 गुणांसह पहिल्या स्थानावर असून मुंबईच्या संघाला तीन विजयांसह फक्त सहा गुणांची कमाई करता आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसमोर राजस्थानला रोखण्याचे आव्हान असणार आहे. या सिझनमध्ये मुंबईत झालेल्या आयपीएल लढतीत राजस्थानने मुंबईचा सहा विकेट आणि 27 चेंडू राखून धुव्वा उडवला होता. या पराभवाची परतफेड करण्यासाठी मुंबईचा संघ सज्ज झाला असेल. रियान परागच्या नाबाद 54 धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने दमदार विजय साकारला होता. (हेही वाचा - IPL 2024 Points Tables: गुजरातने पंजाबचा तीन गडी राखून केला पराभव, पाहा पॉइंट टेबलची स्थिती)

मुंबईच्या संघाने मागील चार सामन्यांमधून तीन सामन्यांमध्ये विजय संपादन केले आहेत. मुंबईच्या या यशात जसप्रीत बुमरा या वेगवान गोलंदाजाचा सिंहाचा वाटा आहे. त्याने सात सामन्यांमधून 13 फलंदाज बाद केले आहेत. त्याने या दरम्यान 5.96च्या सरासरीने धावा दिल्या आहेत. तर जेराल्ड कोएत्झी याने सात सामन्यांमधून 12 फलंदाज बाद केले आहेत; पण त्याच्या गोलंदाजीवर 9.92च्या सरासरीने धावा काढण्यात आल्या आहेत.  मुंबईच्या फलंदाजीची मदार रोहित शर्माच्या खांद्यावर आहे. त्याने सात सामन्यांमधून एका शतकासह 297 धावा फटकावल्या आहेत.

दुसरीकडे राजस्थानचा संघ हा चांगली कामगिरी करत आहे.  कर्णधार संजू सॅमसन , रियान पराग आणि जॉस बटलर या तीन फलंदाजांकडून चांगली फलंदाजी ही करण्यात आली आहे. तर यशस्वी जयस्वालचा सुमार फॉर्म त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे.  राजस्थानचा गोलंदाजी विभागही चांगली कामगिरी करत असून ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहल हे समोरच्या संघाला खिंडार पाडण्याचे काम करत आहे.