पाकिस्तानच्या ४० मल्लांना धूळ चारणाऱ्या हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Ganpatrao Andalkar (संपादित प्रतिमा)

पुणे: राज्य आणि देशभरातील अनेक मल्लांचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक असलेले हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचे निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ८५ वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती खालावी होती. त्यांच्यावर पुण्यातील जोशी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थीवार आज (सोमवार, १७ सप्टेंबर) कोल्हापूर येथील पुनवत (ता. शिराळा) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. विशेष असे की, आंदळकर यांनी आपल्या एकूण कारकिर्दीत पाकिस्तानच्या तब्बल ४० मल्लांना धूळ चारली होती. त्यांच्या या सर्वच लढती प्रचंड लोकप्रिय ठरल्या.

सच्चा मार्गदर्शक हरपला

हिंदकेसरी पैलवान आंदळकर यांच्या पश्चात मुलगा अभिजित, पत्नी व नातवंडे असा परिवार आहे. आंदळकर यांच्या जाण्याने कुस्तिच्या आखाड्यात डावला प्रतिडाव शिवणारा एक सच्चा मार्गदर्शक हरपला, अशी भावना कुस्तीप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

हिंदकेसरी पैलवान आंदळकर यांची कारकिर्द थोडक्यात....

-दरबारी मल्ल आणि वस्ताद बाबासाहेब वीर यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे प्रशिक्षण

-१९६४ साली भारत सरकारकडून त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित

-कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्टच्या शाहू पुरस्काराने सन्मानीत

-१९६० मध्ये हिंदकेसरीची गदा पटकावली.

-पै. आंदळकर यांनी केलेल्या पाकिस्तानी मल्ल गोगा पंजाबी, सादिक पंजाबी, जिरा पंजाबी, नसिर पंजाबी, दिल्लीचा खडकसिंग पंजाबी, अमृतसरचा बनातसिंग पंजाबी, पतियाळाचा रोहेराम, लिलाराम, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, महंमद हनिफ, श्रीरंग जाधव या नामवंत मल्लाबरोबरीच्या लढती प्रचंड गाजल्या.

-१९६२ मध्ये जकार्ता येथे झालेल्या अशियायी स्पर्धेत त्यांनी सुपर हेवी गटात ग्रीको रोमन स्टाइलमध्ये सुवर्णपदक तर फ्री स्टाइलमध्ये रौप्यपदक.

-१९६४ मध्ये टोकिओ ऑलि​पिंकमध्ये हेवी गटात भारतीय कुस्ती संघाचे नेतृत्व.

-महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल १९८२ मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने गौरव .