Arrested | (File Image)

मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड (World Cup semi final India New Zealand) यांच्यातील बहुप्रतिक्षित पुरुष विश्वचषक उपांत्य फेरीच्या लढतीच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे, असे पोलिसांनी सांगितले. आकाश कोठारी असे आरोपीचे नाव आहे. जेजे पोलीसांनी त्याला मालाड येथील त्याच्या घरातून अटक केली. भारत-न्यूझीलंट सामन्याची तिकीटे (Black Marketing of India New Zealand Match Tickets) उपलब्ध असल्याचा एक मेसेज अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये फिरत होता. ज्यामध्ये 27,000 ते 2.5 लाख रुपयांपर्यंत तिकीट उपलब्ध असल्याचा दावा केला जात होता, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, आरोपी मूळ किमतीच्या चार ते पाच पटीने अधिक किमतीने तिकिटे विकत होता. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि 511 अंतर्गत फसवणूक आणि इतर गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला आहे. तो एकटाच विक्रेता आहे की, आणखी काही लोक या रॅकेटमध्ये सामील आहेत हे शोधण्यासाठी पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने ही तिकिटे कोठून आणली हे देखील जाणून घेण्यासाठी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा, IND vs NED ICC World Cup 2023: टीम इंडिया दिवाळीला चाहत्यांना देणार विजयाची भेट, 36 वर्षांनंतर खेळणार सामना)

एएनआय एक्स पोस्ट

मुंबई परिमंडळ एक चे डीसीपी प्रवीण मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मूळ तिकीटे 2500 ते 4000 रुपयांना विकली जात होती, मात्र, आरोपींनी ती 25000-50000 रुपयांना विकली. न्यूझीलंड विरुद्ध भारत विश्वचषक सामन्याचे तिकीट, ज्याची किंमत सुमारे 2500 ते 4000 रुपये असेल, ती 25000-50000 रुपयांना विकली जात होती. माहिती मिळाल्यानंतर आमच्या पथकाने आरोपींशी संपर्क साधून कारवाई केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

व्हिडिओ

पोलिसांनी नागरिकांना अवाहन केले आहे की, त्यांनी अनधिकृत व्यक्ती आणि अनधिकृत साइटवरून तिकिटे खरेदी करू नयेत. तिकीट खरेदी करण्यासाठी फक्त अधिकृत साइट्सचा संदर्भ घ्यावा. उद्या मुंबईत होणाऱ्या ICC पुरुष क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा न्यूझीलंडशी सामना होणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेत आतापर्यंत अपराजीत राहिली आहे.

दरम्यान, भारताने 100% विजयी विक्रमासह ICC पुरुष एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. भारताने 8 पैकी 8 सामने जिंकले असून, उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. भारत अंतिम साखळी सामना हरला तरी गुणतालिकेत अव्वल स्थान निश्चित आहे. यंदाच्या विश्वचषकाच्या फॉरमॅटनुसार, भारत बुधवार, 15 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या संघासोबत उपांत्यपूर्व 1 मध्ये खेळणार आहे.