Coronavirus मुळे रद्द झालेल्या विंबलडन आयोजकांना विम्यातून मिळणार 1069 कोटी रुपये
विम्बल्डन (Photo Credits: Getty Images)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे वर्षाचे दुसरे ग्रँड स्लॅम, विंबलडन (Wimbledon) यंदा रद्द करण्यात आले आहे. दुसऱ्या विश्वयुद्धानंतर विंबलडनची ग्रँड स्लॅम स्पर्धा रद्द करण्याचीही पहिलीच वेळ आहे. स्पोर्ट्स बिझनेस अ‍ॅनालिस्ट डॅरेन रौल यांच्या म्हणण्यानुसार, स्पर्धा रद्द झाल्यामुळे विंबलडनला विमाच्या रूपात अंदाजे 1,069 कोटी रुपये मिळतील. विंबलडनचे आयोजक मागील 17 वर्षांपासून दर वर्षी महामारी विमा म्हणून सुमारे 15 कोटी रुपये देत होते. 29 जून ते 12 जुलै या कालावधीत क्लबच्या ग्रासकोर्टवर ही स्पर्धा खेळली जाणार होती पण आता स्पर्धा रद्द केल्याने पुढचा हंगाम 28 जून ते 11 जुलै 2021 दरम्यान खेळला जाईल. कोलिड-19 च्या चिंतेमुळे ऑल इंग्लंड क्लबच्या मुख्य मंडळाने आणि चॅम्पियनशिपच्या व्यवस्थापन समितीने यावर्षी ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल खेद व्यक्त करत क्लबने एक निवेदन जारी केले होते. (COVID-19: कोरोना व्हायरसमुळे विम्बल्डन 2020 रद्द, दुसऱ्या विश्व युद्धानंतर पहिल्यांदा नाही खेळली जाणार ग्रँडस्लॅम स्पर्धा)

“ऑल इंग्लंड क्लब (एईएलटीसी) च्या मुख्य मंडळाने आणि द चॅम्पियनशिप्स ऑफ मॅनेजमेंट कमिटी’ने आज निर्णय घेतला आहे की कोरोना व्हायरसशी संबंधित सार्वजनिक आरोग्याच्या चिंतेमुळे चॅम्पियनशिप 2020 रद्द केली जाईल. त्याऐवजी 134 व्या स्पर्धांचे आयोजन 28 जून ते 11 जुलै 2021 या कालावधीत होईल, ”असे एईएलटीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

ही स्पर्धा प्रथम 1877 मध्ये खेळली गेली होती आणि त्यानंतर दरवर्षी आयोजित केली जात होती. 1915 ते 1918 दरम्यान पहिल्या महायुद्धामुळे तर दुसरे महायुद्धामुळे 1940 ते 1945 दरम्यान ही स्पर्धा आयोजित केली गेली नव्हती. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे यंदा होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली आहे. या व्हायरसमुळे रद्द होणारी विंबलडन पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. मे महिन्यात आयोजित होणारं फ्रेंच ओपन आता सप्टेंबरच्या उत्तरार्धात आयोजित केलं जाईल. यूएस ओपन न्यूयॉर्कमध्ये 31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर दरम्यान खेळला जाईल.