Tokyo Olympics 2020: फ्रीस्टाईल कुस्तीत Ravi Kumar Dahiya ने निश्चित केले ऑलिम्पिक मेडल, सुवर्ण पदकाच्या दावेदाराच्या जीवना संबंधित जाणून घ्या
रवी कुमार दहिया (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020: युवा भारतीय कुस्तीपटू रवी कुमार दहिया (Ravi Kumar Dahiya) याने बुधवारी टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) 2020 मध्ये इतिहास रचला. त्याने पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाईल कुस्तीच्या उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या नुरिस्लाम सनायेवचा (Nurislam Sanayev) पराभव करून देशासाठी ऑलिम्पिक रौप्य पदक निश्चित केले. सुरुवातीला 5-9 अशा पिछाडीवर पडलेल्या रवी कुमारने तीन महत्त्वाचे गुण कमावले आणि अंतिम फेरीत झोकात प्रवेश केला. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये  (Olympic Games) भारतासाठी मेडल जिंकणारा रवी कुमार दहीया पाचवा कुस्तीपटू ठरला आहे. याआधी के. डी. जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक या चार खेळाडूंनी भारतासाठी मेडल जिंकण्याची कमाल केली होती. पण अंतिम सामन्यात रवीची नजर आता सुवर्ण पदकावर असणार आहे. (When is Ravi Kumar Dahiya Next Fight? भारतीय पैलवान रवी कुमार दहियाचा सुवर्ण सामना कधी होणार, जाणून घ्या कुस्तीपटूच्या पुढील मॅचची तारीख व वेळ)

रवीकुमार दहिया हा हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील नहरी गावाचा राहणार आहे आणि त्याने वयाच्या दहा वर्षांत कुस्तीच्या युक्त्या शिकण्यास सुरुवात केली होती. त्याचे वडील-राकेश दहिया, एक शेतकरी, अनेकदा उत्तर दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर दररोज प्रवास करायचे जिथे 23 वर्षीय इतर कुस्तीगीरांसोबत प्रशिक्षण घ्यायचा. दहिया आपल्या प्रशिक्षणादरम्यान योग्य आहार राखू शकेल याची खात्री करण्यासाठी त्याचे वडील आपल्या गावापासून स्टेडियमपर्यंत दूध, फळे आणि इतर खाद्यपदार्थांसह प्रवास करायचे. दहियाने ब्राझीलमध्ये 2015 जागतिक जुनिअर कुस्ती स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करत आपल्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांनतर त्याने मागे वळून पहिले नाही आणि देशासाठी अनेक पदक जिंकले. त्याला गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे 2017 मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय खेळांमध्ये उपांत्य फेरी गाठल्यानंतर त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.

2018 मध्ये जागतिक अंडर-23 कुस्ती स्पर्धेत दहियाला आणखी एका रौप्य पदकावर समाधान मानावे लागले पण गेल्या वर्षी नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्याने आपल्या पहिले सुवर्णपदक पटकावले. दहियाने कझाकिस्तान येथील आशियाई चॅम्पियनशिपमध्ये आणखी एक सुवर्णपदक मिळवले आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत प्रवेश निश्चित केला. बुधवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सनाईवविरुद्ध 57 किलो वजनी गटात पुरुषांच्या फ्रीस्टाइलच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या दहियाचे लक्ष आता त्याच्या शानदार कॅबिनेटमध्ये पहिले ऑलिम्पिक सुवर्ण जोडण्याचे असेल. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्यात आजपर्यंत कोणत्याही कुस्तीपटूला यश आले नाही आणि दहियाला इतिहास घडवण्याची संधी आहे.