सेरेना विल्यम्स आणि व्हिक्टोरिया अझरेन्का यूएस ओपन सेमीफायनल 2020 (Photo Credit: Twitter/usopen)

संपूर्ण टेनिस विश्व आणि फॅन्सच्या क्षणाची प्रतीक्षा करत होते तो क्षण पुन्हा एकदा लांबला. अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्सला (Serena Williams) न्यूयॉर्क येथील अमेरिकन ओपन (US Open) टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्यात बेलारूसच्या (Belarus) व्हिक्टोरिया अझरेन्काकडून (Victoria Azarenka) पराभव पत्करावा लागला. या पराभवासह मार्गरेट कोर्ट (Margret Court) यांच्या विक्रमी 24 ग्रँड स्लॅम विजेतेपदाची बरोबरी करण्याची संधी हुकली. घरच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत विक्रमी 24 वे विजेतेपद जिंकण्याचे सेरेनाचे स्वप्न भंगले. सेमीफायनल सामन्यात अझरेन्काने 1-6, 6-3, 6-3 अशा तीन संघर्षपूर्ण सेटमध्ये पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात आता अझारेन्काचा सामना जपानच्या नाओमी ओसाकाशी (Naomi Osaka) होईल. अझरेंका तिसऱ्यांदा तर 7 वर्षानंतर अझरेन्का यूएस ओपन फायनलमध्ये पोहचली आहे. दुसरीकडे, जपानच्या नाओमी ओसाकाने तीन वर्षात दुसऱ्यांदा यूएस ओपनची अंतिम फेरी गाठली. तिने 2018 मध्ये विवादित यूएस ओपन फायनलमध्ये सेरेनाचा पराभव केला आणि पहिले ग्रँड स्लॅम जिंकले. (US Open 2020: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात, रोहन बोपन्ना-डेनिस शापोलोव जोडी पुरुष दुहेरीच्या क्वार्टर-फायनलमध्ये पराभूत)

अझरेन्का यापूर्वी दोनदा यूएस ओपनची उपविजेतेपदावर राहिली आणि आता फायनल गाठल्यानंतर तिचे लक्ष्य पहिले यूएस ओपन ग्रँड स्लॅम विजेतेपदावर असेल. विशेष म्हणजे, ग्रँड स्लॅम स्पर्धेत अझरेन्काचा सेरेनाविरुद्ध हा पहिला विजय ठरला. सेमीफायनलबद्दल बोलायचे तर दोन्ही माजी विजेत्यांनी कडवी झुंज दिली. सेरेना विल्यम्स पहिल्या सेटमध्ये सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसली. सेरेनाने पहिल्या सेटमध्ये अझरेंकाला कोणतीही संधी दिली नाही आणि पहिला सेट 6-1 असा जिंकला. पण अझरेन्काने दुसर्‍या सेटमध्ये शानदार पुनरागमन केले आणि 6-3ने सेट जिंकून सामना अंतिम सेटपर्यंत नेला. तिसर्‍या सेटमध्येही अझरेन्काने सेरेनावर मात केली 6-3 ने विजय मिळवित अंतिम फेरीत स्थान मिळविले.

क्वार्टर फायनल सामन्यात देखील अझारेन्काने शानदार फॉर्म दाखविला. अझरेन्काने एलिस मर्टेन्सचा 6-1, 6-0 ने पराभव करून उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रवेश मिळवला, तर सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या सेरेनाला क्वार्टर फायनल सामन्यात संघर्षानंतर विजय मिळाला होता. सेरेनाने पिरोनकोवाचा क्वार्टर-फायनल सामन्यात 4-6, 6-3, 6-2 असा पराभव केला. तत्पूर्वी, सेरेना आणि अझरेन्का दरम्यान 2012 व 2013 मध्ये यूएस ओपनच्या उपांत्य सामन्यात आमने-सामने आले होते. आणि दोन्ही वेळा अझरेन्काला पछाडत सेरेनाने अंतिम फेरी गाठली.