रोहन बोपन्ना (Photo Credits: IANS)

भारताचा अनुभवी दुहेरीपटू रोहन बोपन्ना (Rohan Bopanna) आणि त्याचा कॅनेडियन जोडीदार डेनिस शापोवालोव (Denis Shapovalov) यांना सोमवारी कडक संघर्षानंतर युएस ओपन 2020 पुरुष दुहेरीच्या उपांत्य पूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. इंडो-कॅनेडियन जोडीला नेदरलँड्सच्या जीन-ज्युलियन रोजर (Jean-Julien Rojer) आणि रोमानियाच्या होरिया टेकाऊ (Horia Tecau) कडून 5-7, 5-7 असा पराभव पत्करावा लागला. फ्लशिंग मीडोज (Flushing Meadows) येथे दुसर्‍या फायनलमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या बोपन्नाने यूएस ओपनमध्ये शापोलोवबरोबर चांगली जोडी बनवली. या जोडीने दुसर्‍या फेरीत 6 व्या मानांकित केविन क्रावेझ आणि अँड्रियास माईल्सला चकित करून अंतिम 8 मध्ये स्थान मिळवले. बोपन्नाच्या पराभवाने अमेरिकन ओपन स्पर्धेत भारताचे आव्हान संपुष्टात आले. यापूर्वी, 23 वर्षीय सुमित नागलचा पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीमकडून 6-3, 6-3, 6-2 असे सलग सेटमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. (US Open 2020: नोवाक जोकोविच अमेरिकन ओपन स्पर्धेतून आऊट, लाइन ऑफिशिअलला चेंडू मारल्यानंतर केले निलंबित Watch Video)

सुमितने अमेरिकेच्या ब्रॅडली क्लॅनला नमवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. गेल्या सात वर्षात ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात दुसऱ्या फेरीत पोहोचणारा सुमीत हा पहिलाच भारतीय ठरला होता. नागल अमेरिकन ओपन स्पर्धेत दुसऱ्यांदा मुख्य ड्रॉ पर्यंत पोहोचला होता. मागच्या वर्षी नागलची सलामीची लढत 20 ग्रँड स्लॅम विजेता रॉजर फेडररसोबत झाली होती आणि त्याने 4-6 असा एक सेटही जिंकला होता. पण, नंतरच्या तीनही सेटमध्ये नागलला पराभव स्वीकारावा लागला होता.

दरम्यान, दिविज शरणने सर्बियाची जोडीदार निकोला कॅसिकसह पहिल्या फेरीच्या सुरुवातीला पुरूष दुहेरीच्या स्पर्धेतून बाहेर पडले. या जोडीला 8व्या मानांकित निकोला मेटकिक व वेस्ली कूल्हॉफकडून पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे, पुरुष एकेरीत 12 वे मानांकित शापोलोवचा यूएस ओपन 2020 मध्ये बुधवारी उपांत्यपूर्व फेरीत पाब्लो कॅरेनो-बुस्टाशी सामना होईल. महिला एकेरीत 23 ग्रँड स्लॅम चॅम्पियन सेरेना विल्यम्सने क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवले. सेरेनाने चौथ्या फेरीत मारिया सककरीचे 3 सेटमध्ये आव्हान धुडकावून लावले.