येत्या 23 जुलैपासून टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) सुरू होत आहे. यामध्ये भारतातील अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत प्रत्येक भारतीय खेळाडू देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करेल. अशा वेळी त्यांना धैर्य देण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी एआर रहमान (A R Rahman) आणि अनन्या बिर्ला (Ananya Birla) यांनी ‘हिंदुस्थानी वे’ (Hindustani Way) नावाचे एक गाणे सादर केले आहे. हे गाणे त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना समर्पित केले आहे. हे गाणे अतिशय उत्कृष्ट बनले असून, त्याला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
हे गाणे ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केले असून, ते लिहिले व गायले आहे अनन्या बिर्ला यांनी. अनन्या बिर्लाने हे गाणे निर्मिका सिंह आणि शिशिर सामंत यांच्या सहकार्याने लिहिले आहे. ‘हिंदुस्थानी वे’ या गाण्यात एकता आणि आशेचा संदेश देण्यात आला आहे. या गाण्याचे संगीत आणि अनन्याचा आवाज कोणाचाही ताबडतोब उत्साह वाढवेल असा आहे. या गाण्यामध्ये अटलांटा (1996), अथेन्स (2004), बीजिंग (2002), 2008), रिओ (2016), लंडन (2012) मधील महत्त्वाचे ऑलिम्पिक फुटेज समाविष्ट करण्यात आले आहे.
अनन्या एक भारतीय गायिका असून, तिला आंतरराष्ट्रीय स्तरावरही बरीच ओळख मिळाली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार्या भारतीय खेळाडूंना चीअर करण्यासाठी एक गाणे लिहणे आणि ते गाणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे, अनन्याने म्हटले आहे. त्याचबरोबर अनन्याने या प्रकल्पाद्वारे एआर रहमानसोबत काम करायला मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.
अनन्या सुप्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी आहे. तिने हिंदी आणि इंग्रजी भाषेत अनेक गाणी गायली आहेत. गाण्याचा संगीत व्हिडिओ डॅनी मामिक आणि साहन हट्टंगडी यांनी दिग्दर्शित केला, जो बिर्ला यांचे बॅनर अँटीमेटर मीडिया प्रायव्हेटद्वारे निर्मित आहे. दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतातील 100 हून अधिक खेळाडूंची निवड झाली आहे. कोविड-19 मुळे टोकियो ऑलिम्पिकला एक वर्षे उशीर झाला आहे.