Roland Garros 2022: नंबर 1 जोकोविचवर मात करत नदालची आगेकूच, उपांत्य फेरीत अलेक्झांडर झ्वेरेव्हशी भिडणार
राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच (Photo Credit: Twitter/rolandgarros)

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला टेनिसपटू नोवाक जोकोविच (Novak Djokovi) वर्षातील दुसऱ्या ग्रँडस्लॅम फ्रेंच ओपनमधून बाहेर पडला आहे. गतविजेत्या जोकोविचला उपांत्यपूर्व फेरीत लाल मातीचा बादशाह राफेल नदालकडून (Rafael Nadal) 6-2, 4-6, 6-2, 7-6 (7-4) असा पराभवाचा सामना करावा लागला. या विजयासह नदालने टेनिसच्या मोठ्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे, जिथे त्याचा सामना 3 जून रोजी तिसऱ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हशी (Alexander Zverev) होईल. या स्पर्धेत दोघेही 59 व्यांदा आमनेसामने आले होते. या विजयानंतर दोघांमधील विजयाचे अंतर 29-30 झाले आहे. स्पेनच्या नदालने 29 वा सामना जिंकला, तर सर्बियाच्या जोकोविचने एकूण 30 सामने जिंकले आहेत.

या सामन्यात अव्वल मानांकित जोकोविचने पहिला सेट 6-2 असा गमावला आणि त्यानंतर दुसरा सेट 6-4 असा जिंकून सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर स्पॅनिश खेळाडूने 6-2, 7-6 असे सलग दोन सेट जिंकून सामना खिशात घातला. अशाप्रकारे नदाल 15 व्या वेळीस फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. नदालने आतापर्यंत विक्रमी 13 फ्रेंच ओपनचे जेतेपद पटकावले आहे. एका ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळाडूने जिंकलेले हे सर्वाधिक किताब आहेत. याशिवाय नदालने 2 ऑस्ट्रेलियन ओपन, 2 विम्बल्डन आणि 4 यूएस ओपन ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. त्याने वर्षाची सुरुवात ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपद जिंकून 21 ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम केला. नदाल 21 ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिलाच पुरुष टेनिसपटू ठरला. त्याच वेळी, त्याने शेवटच्या वेळी 2020 मध्ये फ्रेंच ओपन जिंकले.

1968 मध्ये सुरू झालेल्या टेनिसच्या ओपन एरामध्ये 13 वेळा समान ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपद जिंकणारा नदाल हा जगातील पहिला खेळाडू आहे. फ्रेंच ओपन लाल मातीवर खेळली जाते. त्यामुळे नदालला लाल मातीचा राजा म्हटले जाते. दुसरीकडे, नदालकडून झालेल्या पराभवामुळे 21 वा ग्रँडस्लॅम सामना जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न भंगले आहे. त्याने 20 ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. जोकोविचने आतापर्यंत 8 ऑस्ट्रेलियन ओपन, 2 फ्रेंच ओपन, 6 विम्बल्डन आणि 3 यूएस ओपनचे जेतेपद पटकावले आहे. लक्षणीय आहे की 2022 च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन सरकारच्या कोविड-19 धोरणांमुळे जोकोविचला वर्षांच्या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतून माघार घेणे भाग पडले होते.