पॅरिसमध्ये सोमवार, 2 सप्टेंबर रोजी झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या भालाफेकपटू सुमित अँटीलने अप्रतिम कामगिरी करून सुवर्णपदक पटकावले. हॉट फेव्हरेट म्हणून स्पर्धेत उतरलेल्या सुमितने आपले वचन पूर्ण केले आणि रेकॉर्डब्रेक कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले. भारतीय खेळाडूने त्याच्या 6 थ्रो दरम्यान दोनदा स्वतःचा पॅरालिम्पिक विक्रम मोडला. पॅरिस येथील अंतिम फेरीतील दुसऱ्या प्रयत्नातच त्याने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत सेट केलेला आपलाच रेकॉर्ड मोडीत काढत यंदाच्या स्पर्धेत सुवर्ण पदकाची दावेदारी जळवास पक्की केली होती. त्याच्या याच प्रयत्नातून नव्या पॅरालिम्पिक रेकॉर्डसह त्याने भारतासाठी यंदाच्या स्पर्धेतील तिसरे सुवर्ण पटकावले. (हेही वाचा - Rubina Francis Wins Bronze Medal: भारतासाठी मिळाले आणखी एक पदक, रुबिना फ्रान्सिसने नेमबाजीत कांस्यपदक जिंकले)

पाहा व्हिडिओ -

भालाफेकपटू सुमित अंतिलने पहिल्या प्रयत्नात 69.11 मीटर भाला फेकल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 70.59 मीटर अंतरावर भाला फेकला. त्याच्या या शानदार कामगिरीच्या आसपासही कोणताच खेळाडू नव्हता. टोकियो नंतर पॅरिसमध्ये सलग दुसऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत त्याने सुवर्ण कामगिरी करत खास विक्रमासह इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिकच नव्हे ऑलिम्पिकमध्येही पुरुष गटात अन्य कोणत्याही स्पर्धकाला सलग दोन वेळा गोल्ड मेडल जिंकता आलेले नाही.

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात जमा झालेले हे तिसरे सुवर्ण पदक असून सर्वात आधी पॅरा नेमबाजीत अवनी लेखरा हिने भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली होती. त्यानंतर पॅरा बॅडमिंटनमध्ये नितेश कुमार या पॅराऑलिम्पियन खेळाडूनं सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती.