हर्षवर्धन सदगीर (Picture Credit: File Photo)

नाशिकचा कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर (Harshwardhan Kesari) यंदाचा महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) ठरला आहे. पुण्याच्या बालेवाडीत (Balewadi) झालेल्या 63 व्या कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धनने लातूरच्या शैलेश शेळके (Shailaesh Shelke) याच्यावर 3-2 ने विजय मिळवत यंदाचे जेतेपद पटकावले. हर्षवर्धन आणि शैलेश, हे दोन्ही पै.काका पवार (Kaka Pawar) यांचे पठ्ठे आहे. हर्षवर्धन विजयी होताच मैदानात जल्लोष करण्यात आला. शिवाय, हर्षवर्धननेही विजयी होताच खिलाडीवृत्तीचं दर्शन घडवत उपविजेत्या शेळकेला खांद्यावर घेऊन त्याचं अभिनंदन केलं. विजयी हर्षवर्धनला कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते मनाची गदा देण्यात आली. गतवर्षी महाराष्ट्र केसरी विजेता आणि उपविजेता अनुक्रमे बाला रफिक शेख आणि उपविजेता अभिजीत कटके हे दोघेही पराभूत झाल्याने शैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात रंगणाऱ्या अंतिम सामन्यात कोण 'महाराष्ट्र केसरी' ठरेल याबात उत्सुकता होती. (हर्षवर्धन सदगीर यंदाचा 'महाराष्ट्र केसरी', शैलेश शेळके उपविजेता; पुणे येथील काका पवार तालमीकडे चांदीची गदा)

दरम्यान, विजयानंतर हर्षवर्धनने शैलेशला खांद्यावर उचलून घेतले आणि त्याच्यासाठी टाळ्या वाजवण्यासाठी प्रेक्षांना प्रोत्साहित केले. दोस्तीत कुस्ती नाही, मात्र कुस्तीत दोस्ती नाही असं म्हटलं जातं, याचं दर्शन हर्षवर्धन आणि शैलेशने यादरम्यान क्रीडा प्रेमींना करून दिले. पाहा हा व्हिडिओ:

या फायनल सामन्यात हर्षवर्धनने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत शैलेशवर वर्चस्व कायम ठेवले. आणि अखेरीस चित्तथरारक सामन्यात 3-2 ने विजय मिळवत महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली. नाशिकचा पैलवार हर्षवर्धन नाशिकच्या बलकवडे आखाड्यात आणि नंतर पुण्यात काका पवारांकडे कुस्तीचे धडे घेतले. त्याला मॅटवरील कुश्तीचा अनुभव आहे आणि एक आक्रमक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. दुसरीकडे, शैलेशच्या रुपात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत लातूराल तब्बल 50 वर्षांनंतर पहिल्यांदाच संधी मिळाली होती. शैलेश हा लातूरमधील औसा तालुक्यातील टाका गावचा रहिवासी आहे.