दिग्गज टेनिस स्टार Rafael Nadal बनला आयटी कंपनी Infosys चा ब्रँड अॅम्बेसेडर; 3 वर्षांचा करार, व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला आनंद (Watch)
राफेल नदाल (Photo Credit: PTI)

जगातील दिग्गज टेनिस स्टार राफेल नदालला (Rafael Nadal) आयटी कंपनी इन्फोसिसचा (Infosys) ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे. इन्फोसिसने स्टॉक एक्सचेंजकडे नियामक फाइलिंगमध्ये हा खुलासा केला आहे. इन्फोसिसचा राफेल नदालसोबत 3 वर्षांचा करार झाला आहे. इन्फोसिसने सांगितले की नदाल ब्रँड आणि डिजिटल इनोव्हेशनचा अॅम्बेसेडर असेल. स्पेनचा 37 वर्षीय राफेल नदाल सलग 209 आठवडे एटीपी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 14 फ्रेंच ओपन विजेतेपदांसह 22 ग्रँड स्लॅब स्पर्धा जिंकल्या आहेत.

गेल्या दशकापासून रॉजर फेडररसह राफेल नदाल टेनिस विश्वात थैमान घालत आहे. आता राफेल इन्फोसिससोबत जोडला जाणार आहे. या करारावर राफेल नदाल म्हणाला, ‘इन्फोसिससोबत जवळून काम करताना मला खूप आनंद होत आहे. कारण कंपनी केवळ विकासासाठीच काम करत नाही, तर उज्वल भविष्यासाठी आपल्या समुदायातील लोकांना सशक्त करण्यावरही भर देत आहे.

तो पुढे म्हणाला. ‘इन्फोसिसने जागतिक टेनिसमध्ये ज्या प्रकारे डिजिटल कौशल्य आणले आहे ते मला आवडले. इन्फोसिसने अब्जावधी चाहत्यांसाठी टेनिसचा अनुभव बदलून टाकला आहे.’ या भागीदारीअंतर्गत, इन्फोसिस आणि नदालचा प्रशिक्षक संघ एकत्रितपणे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सामना विश्लेषण साधन विकसित करेल. आयटी कंपनीसोबत स्पॅनिश खेळाडूची ही पहिलीच भागीदारी आहे. (हेहीत वाचा: Chess World Cup 2023: बुद्धीबळ विश्वचषकावर मॅग्नस कार्लस याचे नाव, भारताचा Praggnanandhaa उपविजेता)

इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी सलील पारीख म्हणाले, ‘जगातील सर्वात प्रतिष्ठित चॅम्पियन अॅथलीट राफेल नदाल याचे कंपनीचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून स्वागत करणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.’ इन्फोसिसने सांगितले की, एटीपी टूर, रोलँड-गॅरोस, ऑस्ट्रेलियन ओपन आणि दी इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेमचे डिजिटल इनोव्हेशन पार्टनर म्हणून ब्रँड इन्फोसिसने एआय, क्लाउड, डेटा अॅनालिटिक्स आणि डिजिटल अनुभवांद्वारे जगभरातील अब्जावधी चाहत्यांपर्यंत टेनिस इकोसिस्टम आणले आहे.