लिअँडर पेस (Photo Credit: Getty Images)

पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध आगामी डेव्हिस कप (Davis Cup) टेनिस सामन्यासाठी गुरुवारी भारताने 8-सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये अव्वल खेळाडूंनी नकार दिल्यानंतर ज्या खेळाडूंनी इस्लामाबादला जाण्यास सहमती दर्शविली अशा खेळाडूंनाही स्थान देण्यात आले आहे. ज्येष्ठ स्टार खेळाडू लिअँडर पेस (Leander Paes) याचे एक वर्षाहून अधिक काळानंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. सुमित नागल, रामकुमार रामनाथन, शशी कुमार मुकुंद आणि रोहन बोपण्णा या संघातील प्रमुख खेळाडू सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये जाण्याबाबत शंका व्यक्त करत होते. अखिल भारतीय टेनिस असोसिएशनने (एआयटीए) जाहीर केलेल्या पथकात जीवन नेडुंचेझियान, साकेत मायनेनी आणि सिद्धार्थ रावत यांचा समावेश आहे. (ATP Ranking मध्ये लिअँडर पेस याला मोठा धक्का, 19 वर्षात प्रथमच पहिल्या 100 मधून बाहेर)

सामान्यत: एआयटीए पाच सदस्यीय संघ निवडतो आणि यात एक किंवा दोन राखीव खेळाडूंचा समावेश असतो. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन (आयटीएफ) पाकिस्तान टेनिस फेडरेशनच्या 29 आणि 30 नोव्हेंबरला इस्लामाबादच्या बाहेर होणाऱ्या सामन्यात हस्तांतर करण्याच्या आवाहनावर विचार करत आहे. अव्वल खेळाडू प्रजनेश गुन्नेस्वरन यांच्या अनुपस्थितीत एकेरीत भारतीय आव्हानाचे नेतृत्व इन-फॉर्म नागल आणि रामकुमार करतील. मुकुंद आणि मायनेनी हे बॅकअप एकेरीचे खेळाडू असतील. या संघात पहिल्यांदाच बोपन्ना, पेस आणि नेडुंचेझियन या रूपात तीन दुहेरी तज्ज्ञ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

नेडूंचेझियानला गेल्या दोन वर्षांत सातत्याने केलेल्या चांगल्या कामगिरीचा पुरस्कार मिळाला आहे. 14 आणि 15 सप्टेंबरला पाकिस्तानविरूद्ध सामना होणार होता तेव्हा नागलचा निवडलेल्या पाच सदस्यांच्या संघात समावेश झाला नव्हता. नगालने त्यावेळी दुखापतीमुळे माघार घेण्याचे ठरविले. द्विज शरण आणि प्रजनेश यांना त्या संघात स्थान मिळालं होतं पण पाकिस्तानमधील सुरक्षेच्या कारणास्तव सामन्यात उशीर झाल्याने आता हे दोघेही वैयक्तिक कारणास्तव अनुपलब्ध आहेत. पाकिस्तानला जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या पेसने एप्रिल 2018 मध्ये चीनविरुद्धच्या सामन्यादरम्यान इतिहास रचणारा दुहेरी सामना जिंकला होता.

पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ पुढीलप्रमाणेः सुमित नागल, रामकुमार रामानाथन, शशी कुमार मुकुंद, सायके मायनेनी, रोहन बोपन्ना, लिअँडर पेस, जीवन नेडुंचेझियान आणि सिद्धार्थ रावत.

कॅप्टन: रोहित राजपाल, प्रशिक्षक: जीशल अली, फिजिओ: आनंद कुमार, टीम मॅनेजर: सुंदर अय्यर.