Kylian Mbappe (Photo credit: Twitter)

फ्रेंच स्टार फुटबॉलपटू किलियन एमबाप्पे (Kylian Mbappe) सध्या नवीन क्लबच्या शोधात आहे. पॅरिस सेंट-जर्मेनबरोबरचा त्याचा करार पुढच्या वर्षी संपत आहे, परंतु क्लबने त्याला नवीन संघ शोधण्याचे आदेश दिले आहेत. एम्बाप्पेची जपान दौऱ्यासाठीही निवड झाली नाही. अशात क्लबने त्याला विकण्याचा निर्णय घेतला आहे. तो आता ट्रान्सफर मार्केटमध्ये उपलब्ध आहे. अशात सौदी अरेबियातील एका क्लबने एमबाप्पेला खरेदी करण्यासाठी बोली लावली आहे. यासाठी त्यांनी विक्रमी 332 दशलक्ष युरो (सुमारे 2725 कोटी रुपये) देऊ केले आहेत.

एमबाप्पे गेल्या महिन्यात म्हणाला होता की, तो पॅरिस सेंट-जर्मेनबरोबरचा करार जून 2024 च्या पुढे वाढवू इच्छित नाही. त्याच्या या वक्तव्याने क्लबला नक्कीच आश्चर्य वाटले होते. एमबाप्पेने 2022 मध्ये पॅरिस सेंट-जर्मेनसोबत नवीन करार केला होता व त्याने 2025 पर्यंत संघासोबत राहण्याचे आश्वासन दिले होते. एमबाप्पे आणि पॅरिस सेंट-जर्मेन यांच्यातील करारानुसार एमबाप्पे 2024 पर्यंत क्लबचा खेळाडू राहील. जून 2024 नंतर तो त्याचा करार एक वर्षासाठी वाढवू शकत होता. आता एम्बाप्पेने क्लबला एक वर्ष अगोदरच पत्र लिहून जून 2024 नंतर करार वाढवणार नसल्याचे सांगितले आहे.

एमबाप्पेच्या निर्णयावर पॅरिस सेंट-जर्मेनने निराशा व्यक्त केली आणि त्याला या सिझनमध्ये विकण्याचा निर्णय घेतला. आता सौदी अरेबियाच्या अल हिलाल क्लबने एमबाप्पेला करारबद्ध करण्यासाठी विक्रमी मानधन देऊ केले आहे. प्रसिद्ध फुटबॉल पत्रकार फॅब्रिजियो रोमानो यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. अल-हिलालने पीएसजीला ऑफर दिली आहे. आता एमबाप्पे आणि पीएसजीला यावर अंतिम निर्णय घ्यायचा आहे. पीएसजी त्याला अल हिलालला विकण्यास तयार असल्याचे मानले जाते, परंतु यासाठी एमबाप्पेची संमती आवश्यक असेल.

(हेही वाचा: Virat Kohli Stats: कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीने रचला नवा विक्रम, 'रन मशीन'ने मोडला ब्रायन लाराचा 'हा' खास रेकाॅर्ड)

केवळ अल-हिलाल क्लबच नाही तर जगभरातील सुमारे अर्धा डझन क्लब एमबाप्पेला खरेदी करण्यासाठी बोली लावू इच्छित आहेत. अल हिलाल व्यतिरिक्त, इंग्लंडच्या टोटेनहॅम हॉटस्पर, चेल्सी, मँचेस्टर युनायटेड यांनीही एमबाप्पेला घेण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे. यासाठी रियल माद्रिद आणि बार्सिलोना या दोन स्पॅनिश क्लबचीही नावे पुढे आली आहेत. त्याचबरोबर इटलीचा क्लब इंटर मिलानलाही एमबाप्पेचा आपल्या संघात समावेश करायचा आहे. मात्र, एमबाप्पेला फक्त रिअल माद्रिदला जायचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला लहानपणापासूनच या क्लबवर प्रेम आहे आणि पीएसजीचा असा विश्वास आहे की त्याने 2024 मध्ये रिअल माद्रिदमध्ये सामील होण्याचे आधीच ठरवले आहे.