टोकियो ऑलिम्पिक स्थगित झाल्याने IOC ला होणार कोट्यवधींचे नुकसान, अध्यक्ष थॉमस बाच यांनी दिली माहिती
टोकियो ऑलिम्पिक 2020 (Photo Credit: Getty)

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रभाव विविध खेळांवरही पडला आहे. टेनिस, क्रिकेट पासून अनेक स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यंदा जपानच्या टोकियोमध्ये आयोजित होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेवरही याचा परिणाम झाला आहे. ऑलिम्पिक 2021 पर्यंत स्थगित करण्यात आले आहे. स्पर्धा स्थगित किंवा रद्द करण्याची ही चौथी वेळ आहे. 1916 मध्ये बर्लिनमधील पहिले ऑलिम्पिक पहिल्या महायुद्धामुळे रद्द करण्यात आले होते. मात्र यंदा स्पर्धा स्थगित केल्याने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) मोठं नुकसान होत असल्याचं समोर आले आहे. आयओसी (IOC) अध्यक्ष थॉमस बाच (Thomas Bach) म्हणाले की कोरोना विषाणूमुळे टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) 2021 पर्यंत तहकूब झाल्याने समितीला कोट्यावधी डॉलर्सचे नुकसान होईल. आयओसी आणि टोकियो आयोजन समितीने जागतिक महामारीचा आजार बनलेल्या कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता हे 2021 पर्यंत पुढे ढकलले आहे. (Coronavirus मुळे रद्द झालेल्या विंबलडन आयोजकांना विम्यातून मिळणार 1069 कोटी रुपये)

टोकियो ऑलिम्पिक पुढील वर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात येणार असेल, तर पॅरालंपिक 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2021 या कालावधीत होणार आहे. बाक यांच्या म्हणण्यानुसार ऑलिम्पिक स्थगित झाल्याने नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज बांधणे कठीण आहे. ते म्हणाले, "आम्हाला माहिती आहे की आयओसीला त्यातून कोट्यावधी डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागेल. अशा कठीण काळात आपण जगभरातील पाठिंब्याची अपेक्षा करू शकत नाही. आपण प्रत्येकाचे समाधान करू शकत नाही. लोकांना ऑलिम्पिक होण्याचा विश्वास असल्याने आम्ही समाधानी आहोत." जपानने सात वर्षापूर्वीची बोली 7.3 अब्ज डॉलर्स मध्ये जिंकली होती.

ते म्हणाले, "अशा कठीण वेळी आमच्यासाठी अजूनही एथलीट्सची सुरक्षा सर्वोपरी आहे आणि म्हणून आम्ही ऑलिम्पिक तहकूब केले." जर्मनीतील एका वृत्तपत्राशी बोलताना बाक यांनी हे विधान केले. दुसरीकडे, शुक्रवारी, टोकियो आयोजन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की साथीच्या रोगाने पुढच्या वर्षी होणाऱ्या खेळांबद्दल काही शंका कायम आहेत.