Israel's war on Hamas: इजिप्तमधील जागतिक कॅडेट बुद्धिबळ स्पर्धेतून  भारताची माघार, इस्त्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

World Cadet Chess Championship: इस्रायल-हमास युद्धाच्या (Israel's war on Hamas) पार्श्वभूमीवर भारतीय संघाने इजिप्तमध्ये होणाऱ्या आगामी जागतिक कॅडेट बुद्धिबळ स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. शर्म अल शेख येथे शनिवारपासून (१४ ऑक्टोबर) ही स्पर्धा सुरू होणार असून सहभागी खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इस्रायल आणि हमासवरील युद्धादरम्यान आतापर्यंत 1,300 मरण पावले आणि 3,300 हून अधिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृतांच्या आणि जखमींच्या संख्येबाबत अद्यापही निश्चित अशी माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे या हल्ल्यात मृतांची आणि जखमींची संख्या वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आलेले शर्म अल शेख हे ठिकाण इस्रायल सीमेपासून 400 किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. त्यामुळे विद्यामान युद्धस्थिती विचारात घेता स्पर्धा पुढे ढकलण्याची विनंती अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने (AICF) जागतिक संघटना FIDE ला केली आहे. या विनंतीला मान देऊन स्पर्धा पुढे ढकलली जाते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यन, 14 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या कालावधीत खेळल्या जाणार्‍या जागतिक कॅडेट बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये - 12, 10 आणि 8 वर्षांखालील - विविध श्रेणीतील तब्बल 39 खेळाडू जाणार होते. प्राप्त माहितीनुसार या स्पर्धेसाठी जाणाऱ्यांमध्ये खेळाडू आणि अधिकारी, कर्मचारी मिळून 80 जणांचा समावेश होता.

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ अर्थातच AICF च्या हवाल्याने वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धादरम्यान असलेली गाझा पट्टीतील सध्याची परिस्थिती आणि सहभागींचे वय लक्षात घेता. तसेच, इजिप्तची सीमा गाझा तसेच इस्रायलला लागून असल्याने युवा खेळाडूंची सुरक्षा आणि सुरक्षेच्या सर्व बाबींचा विचार करता, योग्य विचारविनिमय केल्यानंतर, जागतिक कॅडेट बुद्धिबळ चॅम्पियनशिप-2023 मधील भारतीय संघाचा सहभाग मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

ICF प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, स्पर्धेतून माघार घेण्याचा हा कठोर निर्णय सक्तीची घटना आणि अनपेक्षित परिस्थितीच्या आधारे घेतला आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमच्या खेळाडूंनी जवळपास एक वर्षाचे प्रशिक्षण घेतले असले तरीही आम्ही आमच्या खेळाडूंच्या सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व देतो,” असे AICF ने म्हटले आहे. दरम्यान, हमास आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धाचा मोठा फटका विविध देशांतील नागरिकांना भसला आहे. इस्त्रायलमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनाही भारतीय दूावासाच्या मदतीने भारतात आणण्यात आले आहे.