IND vs BEL Tokyo 2020 Hockey: सुवर्ण स्वप्न भंगले! बेल्जियमविरुद्ध भारत पुरुष हॉकी टीम सेमीफायनलमध्ये 5-2 ने पराभूत
भारत विरुद्ध बेल्जियम हॉकी (Photo Credit: PTI)

IND vs BEL Tokyo 2020 Hockey: तब्बल 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक (Olympics) पदकाचा दुष्काळ संपवण्याचा निर्धार करत आज विश्वविजेत्या बेल्जियम (Belgium) विरोधात मैदानात उतरलेल्या मनप्रीत सिंहच्या भारतीय पुरुष हॉकी संघाला (India Men's Hockey team) सेमीफायनलमध्ये धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बेल्जियम संघाने भारताविरुद्ध 5-2 असा विजय मिळवला व 1980 नंतर पहिल्या हॉकी सुवर्ण पदक पटकावण्याचे टीम इंडियाचे (Team India) स्वप्न मोडले. बेल्जियम संघाने सुरुवातीपासून भारतीय संघावर वर्चस्व गाजवले होते. दरम्यान, या पराभवासह आता ऑलिम्पिक कांस्य पदकासाठी टीम इंडियापुढे ऑस्ट्रेलिया विरुद्ध जर्मनी यांच्यातील पराभूत झालेल्या संघाचे आव्हान असणार आहे. बेल्जियमने यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीत स्पेनला 3-1 ने पराभूत करून सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. (Tokyo Olympics 2020: भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी, ऑस्ट्रेलियाचे आव्हान धुडकावून सेमीफायनल फेरीत मारली धडक)

दरम्यान, सामन्याच्या पहिल्या पाच मिनिटांमध्ये बेल्जियमने सामन्यावर वर्चस्व गाजवलं. सामन्याच्या सुरुवातीच्या अवघ्या काही मिनिटांतच बेल्जियमने गोल करत 1-0 ची आघाडी घेतली. मात्र, त्यानंतर भारताने दोन मिनिटांच्या अंतरात एकामागोमाग एक दोन गोल करत पहिल्या क्वार्टरमध्ये 2-1 ने आघाडी मिळवली. त्यानंतर, दुसऱ्या क्वार्टरमध्ये केवळ एक गोल झाला. बेल्जियमने केलेल्या या एकमेव गोलमुळे हाफ टाइमनंतर सामना 2-2 च्या बरोबरीत पोहचला. अखेरीच्या क्वार्टरमध्ये बेल्जियमने अ‍ॅलेक्झॅडर हेनरीक्सने गोल करत संघाला भारताविरुद्ध 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बेल्जियमला कामागोमाग एक तीन पेनल्टी कॉर्नर देण्यात आले. यामध्ये एकाचा त्यांनी फायदा करून घेत गोल केला. हेनरीक्सने सामन्यामध्ये हॅटट्रीक मारली. यासह बेल्जियमने अखेरच्या क्षणी 4-2 ची आघाडी घेतली. शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक असताना बेल्जियमने पाचवा गोल केला आणि भारताविरुद्ध विजयावर शिक्कामोर्तब केला.

दरम्यान, यापूर्वी भारताने ब्रिटनला 3-1 असे नमवून उपांत्य फेरी गाठली होती. दुसऱ्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 1-7 अशा मानहानिपूर्ण पराभवानंतर भारताने सलग चार सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवत आजच्या ऐतिहासिक सामन्यात प्रवेश केला होता. दुसरीकडे, पुरुष हॉकी संघ आता कांस्य पदकासाठी स्पेनशी लढा देणार असून आता हॉकीमध्ये सुवर्ण पदकाच्या आशा महिला संघाकडून असेल. राणी रामपालच्या नेतृत्वात संघ पहिल्यांदा ऑलिम्पिक सेमीफायनलमध्ये पोचला असून त्यांचा सामना अर्जेन्टिना संघाशी होणार आहे. भारतीय महिला हॉकी संघाने 41 वर्षांनंतर उपांत्यपूर्वी फेरी गाठली असून यापूर्वी भारतीय महिला संघ 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता.