Tokyo Olympics 2020: भारतीय महिला हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी, ऑस्ट्रेलियाचे आव्हान धुडकावून सेमीफायनल फेरीत मारली धडक
भारतीय महिला हॉकी संघ (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) खेळात भारतीय महिला हॉकी संघाची (India Women's Hockey Team) विजयी घोडदौड सुरूच आहे. राणी रामपालच्या (Rani Rampal) महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलिया (Australia) संघाचा 1-0 असा पराभव करून इतिहासात पहिल्यांदा सेमीफायनल फेरी गाठली आहे. यासह सेमीफायनलमध्ये भारत अर्जेन्टिना संघाशी भिडणार आहे. भारतीय संघ (Indian Team) आता सुवर्णपदकापासून दोन विजय दूर आहे. भारताकडून गुरजीत कौरने एकमात्र गोल करत संघाला आधी आघाडी व नंतर विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. यासोबतच मनप्रीत सिंहच्या पुरुष संघासोबत महिला टीमने भारताच्या पदकाच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. यापूर्वी भारतीय संघाने आर्यलड आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांविरुद्ध मिळवलेल्या विजयांच्या बळावर सहा गुणांची कमाई केली आणि अ-गटात चौथे स्थान मिळवले. अव्वल चार संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरल्याने भारताने बाद फेरी गाठली. (Tokyo Olympics 2020: भारतीय पुरुष हॉकी टीम सेमी फायनलमध्ये दाखल)

दरम्यान, भारतीय महिला हॉकी संघाने 41 वर्षांनंतर उपांत्यपूर्वी फेरी गाठली असून यापूर्वी भारतीय महिला संघ 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. महिला खेळाडूंबद्दल बोलायचे तर भारतीय संघाने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेत ऑस्ट्रेलियन संघावर दबाव आणला होता. यादरम्यान, संघासाठी गुरजीत कौरने संघाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत गोल झळकावत 1-0 ने आघाडी मिळवून दिली. शिवाय, ऑस्ट्रेलिया संघाला 7 पेनल्टी कॉर्नर्स मिळाले पण ते त्याचे गोलमध्ये रूपांतर करू शकले नाही. दुसरीकडे, रविवारचा दिवस भारतासाठी एक चांगला दिवस ठरला. एकीकडे बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला, तर पुरूष हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.

तब्बल 4 दशकानंतर भारतीय पुरूष संघाने उपांत्य फेरीत पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाकडून 1-7 ने पराभवाचे तोंड पाहिल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केलं आणि ‘अ’ गटातील 5 पैकी 4 सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनला पराभूत करत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे. यासह आता उपांत्य फेरीत भारताचा सामना बेल्जियमशी होणार आहे. बेल्जियम संघाने सेमीफायनल फेरीत प्रवेश करण्यासाठी स्पेनला 3-1 अशी धूळ चारली. तसेच दुसऱ्या पुरुष हॉकी उपांत्य फेरी सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी या दोन संघात टक्कर होणार आहे.