Fit India Movement (Photo Credits: Pixabay and File Photo)

‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 13 ऑगस्टला 'फिट इंडिया फ्रीडम रन  2.0' चा प्रारंभ होणार आहे. युवक कल्याण  आणि क्रीडा मंत्रालयाच्या या संकल्पनेअंतर्गत 75 जिल्ह्यांमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यातील 75 गावांमध्ये 2 ऑक्टोबर 2021 पर्यंत साप्ताहिक कार्यक्रम आयोजित केले जातील. दीड महिन्यात एकूण 744 जिल्ह्यात हे कार्यक्रम होतील. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर या राष्ट्रव्यापी कार्यक्रमाचा प्रारंभ करतील. सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल,रेल्वे, इंडो-तिबेट सीमा पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा दल, नेहरू युवा केंद्र यासारख्या संस्था देशातल्या ऐतिहासिक आणि महत्वाच्या ठिकाणाहून दूर दृश्य प्रणाली द्वारे या कार्यक्रमात सहभागी होतील.

महाराष्ट्रामध्ये  फिट इंडिया फ्रीडम रन 

महाराष्ट्रात, मुंबईतले ऑगस्ट क्रांती मैदान, पुण्यातला आगाखान पॅलेस, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे रत्नागिरी येथील जन्मस्थान, वर्धा इथला सेवाग्राम आश्रम, नागपूर मधला सीताबुल्डी किल्ला तसेच अकोला, गोंदिया आणि चंद्रपूर इथल्या  ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणाहून  फिट इंडिया फ्रीडम रन होणार आहे. फ्रीडम रनचा असाच कार्यक्रम अहमदनगर आणि अमरावती मध्ये 14 ऑगस्ट 2021 ला होणार आहे. महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातही त्यानंतरच्या आठवड्यात असा कार्यक्रम होणार आहे.

फिटनेस की डोस, आधा घंटा रोज 

तंदुरुस्त आणि आरोग्यपूर्ण  भारताचा संकल्प प्रत्येक नागरिकाने करावा असे करत आवाहन  तंदुरुस्त आणि आरोग्यपूर्ण   भारतच बलवान भारत असेल असे युवा कल्याण आणि क्रीडा मंत्र्यांनी जनतेला दिलेल्या संदेशात म्हटले आहे.  लोकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात धावणे आणि खेळ यासारख्या तंदरुस्ती राखणाऱ्या फिटनेस उपक्रमात सहभागी व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, तसेच लठ्ठपणा, आळशीपणा, तणाव, चिंता, आजार यापासून मुक्तता मिळवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.  यातील "फिटनेस की डोस आधा घंटा रोज" मोहिमेद्वारे,नागरिकांनी रोज किमान 30 मिनिटे शारीरिक व्यायाम करण्याचा संकल्प करण्यासाठी आवाहन केले जात आहे.

फिट इंडिया फ्रीडम रन  2.0  च्या यंदाच्या प्रमुख उपक्रमांमध्ये प्रतिज्ञा, राष्ट्रगीत सादर करणे, फ्रिडम रन, कार्यक्रमस्थळी सांस्कृतिक कार्यक्रम, सहभागासाठी युवा स्वयंसेवकांमध्ये जागरूकता आणि त्यांच्या गावांमध्ये अशाच फ्रीडम रनचे आयोजन यांचा समावेश आहे.

समाजातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, पंचायत राज  प्रतीनिधी , सामाजिक कार्यकर्ते, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, प्रसारमाध्यमे, डॉक्टर, शेतकरी आणि लष्कराच्या जवानांना त्यांनी विविध स्तरांवर या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, कार्यक्रमात सहभागी व्हावे,  लोकांना प्रोत्साहित करावे, प्रेरित करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

लोक फिट इंडिया पोर्टल https://fitindia.gov.in वर नोंदणी करू शकतात आणि आपली दौड  अपलोड करू शकतात. तसेच या उपक्रमाचा आपल्या सोशल मिडिया हँडलवरुन #Run4India आणि #AzadikaAmritMahotsav वरून प्रोत्साहनही देऊ शकतात.