EURO 2020 Round of 16: यूरो कप स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यांसाठी 16 संघ सज्ज, जाणून घ्या कोणता संघ कोणाशी भिडणार
क्रिस्टियानो रोनाल्डो (Photo Credit: PTI)

EURO 2020 Round of 16 Fixtures: युरो (EURO) 2020 आता आपल्या अखेरच्या टप्प्यात येऊन पोहचला असून स्पर्धेच्या साखळी फेरीतील सामने संपल्यानंतर आता बाद फेरीतील 16 संघ निश्चित झाले आहेत. या 16 संघांमध्ये चषकासाठी लढत रंगणार असून यातून उपांत्यपूर्व फेरीत संघ पोहोचणार आहेत. साखळी फेरीत एकही सामना न गमवणाऱ्या इटली (Italy), बेल्जियम, नेदरलँड या संघांनी सर्वप्रथम बाद फेरीत धडक मारली. त्यानंतर वेल्स (Wales), डेन्मार्क, चेक रिपब्लिक, क्रोएशिया, स्पेन (Spain), इंग्लंड (England) आणि स्वीडन संघांनी बाद फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. 'ग्रुप ऑफ डेथ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या F ग्रुपमधून कोणता संघ क्वालिफाय करेल याची चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून होती. (Cristiano Ronaldo याच्या 'त्या' कृतीमुळे Coca Cola कंपनीला 4 अब्ज डॉलर्सचा जबर फटका, Euro 2020 स्पर्धेतील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल)

पोर्तुगाल विरुद्ध फ्रान्स आणि जर्मनी विरुद्ध हंगेरी दोन्ही सामने बरोबरीत सुटले. अखेरच्या क्षणांपर्यंत चारही संघ विजयी गोल मारण्यासाठी धडपडत होते. पण चारची संघ गोल करण्यात अपयशी ठरल्यावर सामना अनिर्णित राहिला. या गटातून जर्मनी, फ्रान्स आणि पोर्तुगाल संघाने नॉकआऊट फेरीत प्रवेश केला आहे. सर्वाधिक युरोपियन चँपियनशिप जेतेपद पटकावणाऱ्या स्पेन संघाला पात्रता मिळवण्यासाठी शेवटच्या सामन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान, अंतिम-16 फेरीत एकूण 8 सामने होणार असून वेल्स विरुद्ध डेन्मार्क यांच्यातील सामन्याने फेरीची सुरुवात होईल. या टप्प्यात 8 संघ विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडतील व उर्वरित 8 संघ स्पर्धेच्या पुढील टप्प्यात पोहोचतील.

पाहा युरो 2020 राऊंड-16 सामन्याचे वेळापत्रक

वेल्स विरुद्ध डेन्मार्क (भारतीय वेळ रात्री 9:30, शनिवार 26 जून, अमस्टरडॅम)

इटली विरुद्ध ऑस्ट्रिया (भारतीय वेळ रात्री 12:30, रविवार 27 जून, लंडन)

नेदरलँड्स विरुद्ध झेक प्रजासत्ताक (भारतीय वेळ रात्री 9:30, रविवार 27 जून, बुधापेस्ट)

बेल्जियम विरुद्ध पोर्तुगाल (भारतीय वेळ रात्री 12:30, सोमवार 28 जून, सेव्हिले)

क्रोएशिया विरुद्ध स्पेन (भारतीय वेळ रात्री 9:30, सोमवार 28 जून, कोपेनहेगन)

फ्रान्स विरुद्ध स्वित्झर्लंड (भारतीय वेळ रात्री 12:30, मंगळवार 29 जून, बुधापेस्ट)

इंग्लंड विरुद्ध जर्मनी (भारतीय वेळ रात्री 9:30, मंगळवार 29 जून, लंडन)

स्वीडन विरुद्ध युक्रेन (भारतीय वेळ रात्री 12:30, बुधवार 30 जून, ग्लासगो)

उपांत्यपूर्व फेरीची सुरुवात 02 जुलै रोजी सेंट पीटर्सबर्ग येथे होईल तर दोन्ही सेमीफायनल सामने 06 आणि 07 जुलै लंडनमध्ये होणार आहेत. 11 जुलै रोजी लंडनमध्ये अंतिम सामना रंगणार आहे.