Cristiano Ronaldo याच्या 'त्या' कृतीमुळे Coca Cola कंपनीला 4 अब्ज डॉलर्सचा जबर फटका, Euro 2020 स्पर्धेतील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
क्रिस्टियानो रोनाल्डो (Photo credit: Twitter)

युरो कप (Euro Cup) 2020 दरम्यान मंगळवारी पोर्तुगाल (Portugal) संघाचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) दोन कोका-कोला (Coca-Cola) बाटल्या आपल्या समोरून काढून टाकल्या आणि त्याऐवजी लोकांना पाणी पिण्यास उद्युक्त केले, या घटनेने यूजर्समध्ये मोठा परिणाम झाला. जगातील फुटबॉलमधील तंदुरुस्त खेळाडूंपैकी एक पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर कोका-कोला बाटल्यांमुळे चिडलेला दिसुन आला आणि त्याने बाटल्या बाजूला ठेवल्या. रोनाल्डोच्या कृतीने पेय ब्रॅण्डच्या शेअर (Coca-Cola Shares_ किंमतीत 1.6 टक्क्यांनी घट झाली आहे. अशाप्रकारे कोका-कोलाचे 4 अब्ज डॉलर्सचे जबर नुकसान झाले आणि त्यांची किंमत 242 अब्ज डॉलर्सवरून घसरून 238 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. विशेष म्हणजे कोका-कोला कंपनी युरो 2020 स्पर्धेचे अधिकृत प्रायोजक आहेत. (Euro 2020: क्रिस्टियानो रोनाल्डोने रचला इतिहास, विश्वविक्रम मोडत पोर्तुगालसाठी मिळवला दमदार विजय)

यूरो कप 2020 स्पर्धेत ‘ग्रुप ऑफ डेथ’ अशी ओळख असलेल्या ‘F’ गटात हंगेरीविरुद्ध सामन्यापूर्वी रोनाल्डो पत्रकार परिषदेसाठी आला होता. यावेळी त्याच्यापुढे कोका कोलाच्या दोन बाटल्या होत्या ज्या त्याने बाजूला केल्या आणि तिथे असलेली पाण्याची बाटली हातात घेऊन ‘पाणी’ असं म्हणत एकाप्रकारे पाणी पिण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं. रोनाल्डोची ही कृती कोका-कोला कंपनीला नक्कीच महागात पडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. तसेच रोनाल्डोच्या अनेक चाहत्यांना माहित असेलच की 36 वर्षीय पोर्तुगाल फुटबॉलर तंदुरुस्त राहण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या थंड आणि वायूयुक्त पेयांपासून दूर राहतो. कोका-कोलाने आपल्या ब्रँडचे मूल्य वाढवण्यासाठी सर्व प्रेस कॉन्फरन्समध्ये कोकच्या बाटल्या प्रदर्शनात ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

दुसरीकडे, हंगेरी विरोधात सामन्याबद्दल बोलायचे तर रोनाल्डोने स्टाईलमध्ये संघाला 3-0 असा विजय मिळवून दिला. सामन्यात रोनाल्डोने विक्रमी 2 गोल करत स्पर्धेत सर्वाधिक 11 गोल करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला. रोनाल्डोच्या खात्यात आता 106 आंतरराष्ट्रीय गोल जमा झाले आहेत. राफेल गुरेराने (Raphael Guerreiro) 84व्या मिनिटाला संघासाठी पहिला गोल केला आणि पोर्तुगालला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर रोनाल्डोने पुढील पाच मिनिटांत दोन गोल केले.