Euro Cup 2020 स्पर्धेतील राउंड ऑफ 16 सामने संपुष्टात आले आहेत. फुटबॉलचा महासंग्राम आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे जिथे आता आठ संघात उपांत्यपूर्व फेरीचे सामने रंगणार आहे. राऊंड 16 च्या आठ सामन्यानंतर 8 संघांचे आव्हान संपुष्टात आले आहे तर अन्य 8 संघ क्वार्टर-फायनल फेरीत पोहचले आहेत जिथे सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आठ संघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळेल. युरो चषक 2020 च्या बाद फेरीसाठी पात्र ठरलेल्या 16 संघांपैकी 8 संघ उपांत्यपूर्व फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. पहिल्या नॉकआऊट सामन्यात डेन्मार्कने (Denmark) वेल्सला 4-0 ने पराभूत करून बाहेरचा रस्ता दाखवला होता तर दुसर्या बाद फेरी सामन्यात इटलीने (Italy) ऑस्ट्रियाचा 2-1 असा पराभव केला होता. (EURO Cup 2020: फ्रान्स संघाला बाहेरचा रस्ता दाखवत स्वित्झर्लंडने केला ‘हा’ भीमपराक्रम; स्पेनची क्रोएशियावर 5-3 ने मात)
तिसर्या बाद फेरीच्या सामन्यात झेक प्रजासत्ताकाने (Czech Republic) नेदरलँड्सचा 2-0 असा पराभव केला. तसेच चौथ्या सामन्यात बेल्जियमने (Belgium) पोर्तुगालचा 1-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. यानंतर पाचव्या बाद फेरीच्या सामन्यात स्पेनकडून (Spain) क्रोएशियाला 3-5 असा पराभव पत्करावा लागला तर स्वित्झर्लंडने (Switzerland) शूटआऊटद्वारे फ्रान्सला परतीचा रस्ता दाखवला. सामना 3-3 असा बरोबरीत सुटल्यानंतर स्वित्झर्लंडने शूटआउटमध्ये 5-4 असा विजय मिळवला. याखेरीज इंग्लंडने (England) जर्मनीला 2-0 असा हरवून स्पर्धेतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखविला तर युक्रेनने स्वीडनचा 2-1ने पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. युरो कप 2020 चे क्वार्टर फायनल सामने 2 जुलैपासून सुरू होणार आहेत. हे सामने जिंकणारा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. भारतीय वेळेनुसार दिवसाचा पहिला सामना रात्री 9.30 वाजता आणि दुसरा सामना रात्री 12.30 वाजता सुरु होईल.
उपांत्यपूर्व सामन्यांचे वेळापत्रक
जुलै 2
स्वित्झर्लंड विरुद्ध स्पेन - रात्री 9:30
बेल्जियम विरुद्ध इटली - रात्री 12:30
जुलै 3
चेक प्रजासत्ताक विरुद्ध डेन्मार्क - रात्री 9:30
युक्रेन विरुद्ध इंग्लंड - रात्री 12:30