Dingko Singh Passes Away: आशियाई सुवर्णपदक विजेता बॉक्सर डिंको सिंह यांचे 42व्या वर्षी निधन, केंद्रीय मंत्री Kiren Rijiju यांनी वाहिली श्रद्धांजली
नानगोंम डिंको सिंह (Photo Credit: Twitter)

बँगकॉक येथे 1998 आशियाई क्रीडा (Asian Games) स्पर्धेचे सुवर्णपदक विजेता बॅंटॅमवेट बॉक्सर नॅंगॉन्म डिंको सिंह (Ngangom Dinko Singh) यांचे गुरुवारी निधन झाले. यकृत कर्करोगापासून  (Cancer) डिंको बर्‍याच वर्षांपासून अनेक आरोग्य संबंधित समस्यांना लढा देत होते. 2017 पासून त्यांच्या कर्करोगावर उपचार सुरू होता. गेल्या वर्षी ते कोविड-19 पॉझिटिव्ह आढळले होते ज्याने यापूर्वी ते झगडत असलेल्या आरोग्याच्या आव्हानांमध्ये आणखी एक भर घातली. पण 41 वर्षीय सिंह यांनी कोरोनावरही मात केली. इम्फाल (Imphal) परत जाण्यापूर्वी जानेवारी 2020 मध्ये डिंको यांनी लिव्हर अँड बिलीअरी सायन्सेस (आयएलबीएस), दिल्ली येथे रेडिएशन थेरपी घेतली होती. सिंह यांच्या निधनावर केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी शोक व्यक्त केला आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.

“श्री. डिंको सिंह यांच्या निधनामुळे मला अतिशय वाईट वाटते. भारताने आजपर्यंत निर्माण केलेल्या सर्वोत्कृष्ट बॉक्सर्सपैकी एक, डिंको यांनी 1998 मध्ये बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करत भारताच्या बॉक्सिंग साखळीला चालना दिली. मी शोकग्रस्त कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करतो,” रिजिजू यांनी ट्विटर पोस्टवर शेअर केले. एप्रिलमध्ये जेव्हा त्याची प्रकृती आणखी बिकट झाल्यावर त्यांना डिंको यांना त्याच रुग्णालयात एरलिफ्ट करण्यात आले. त्याला कावीळचा त्रास देखील झाला होता. 1998 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि 2013 मध्ये त्यांना देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान - पद्मश्री प्रदान करण्यात आला.

आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत डिंको यांनी केवळ भारतासाठी पदकेच जिंकली नाहीत तर सहा वेळा विश्वविजेती मेरी कोम, सरिता देवी आणि विजेंदरसिंग यांच्यासह अनेक बॉक्सरच्या पिढीसाठी ते प्रेरणा बनले. डिंको सिंह भारतीय नौदलात नोकरीस होते आणि तब्येत बिघडण्यापूर्वी त्यांनी प्रशिक्षक म्हणूनही काम केले होते.