दीपिका कुमारी (Photo Credit: Twitter/worldarchery)

रविवारी पॅरिसमधील(Paris) वर्ल्ड कप स्पर्धेत तीन सुवर्णपदकांची हॅटट्रिक नोंदवल्यानंतर भारताची स्टार तिरंदाज दीपिका कुमारीने (Deepika Kumari) सोमवारी रिकर्व्ह महिलांच्या जागतिक क्रमवारीत पुन्हा नंबर वनचे सिंहासन पटकावले आहे. दीपिकाने सातत्यपूर्ण कामगिरी करत विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. तिच्या कामगिरीमुळे भारताने तीन सुवर्णपदकांची कमाई करत टोकियो ऑलिम्पिकपूर्वी स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवले. दीपिकाने तिने मिश्र, महिला सांघिक आणि एकेरी प्रकारात सुवर्णपदक पटकावत एकाच दिवशी सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक नोंदवली. भारताने या स्पर्धेत चार सुवर्णपदकांसह गुणतालिकेत अग्रस्थान पटकावले आहे. रांचीची 27 वर्षीय दीपिकाने 2012 मध्ये पहिल्यांदा अव्वल स्थान गाठले होते. (सातारचा सुपुत्र प्रविण जाधव याची टोकियो ऑलिंपिक भारतीय तिरंदाजी संघात निवड झाल्याने छत्रपती उदयनराजे यांनी दिल्या शुभेच्छा)

दीपिकाच्या स्वर्ण कामगिरीनंतर वर्ल्ड आर्चरीने आपल्या अधिकृत हँडलवर ट्वीट केले होते, “यामुळे दीपिकाला सोमवारी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर स्थान मिळणार आहे.” दीपिकाने प्रथम अंकिता भकत आणि कोमलिका बारी यांच्या साथीने मेक्सिकोवर सहज विजय मिळवत महिला रिकर्व्ह टीम सुवर्णपदक पटकावले. मात्र गेल्या आठवडय़ात याच संघाला टोकियो ऑलिम्पिकसाठीचे स्थान मिळवता आले नाही. त्यानंतर पती अतानू दास (Atanu Das) याच्या साथीने पिछाडीवरून मुसंडी मारत नेदरलँड्सच्या स्जेफ व्हॅन डेन बर्ग आणि गॅब्रिएला स्लोएसरला 5-3 असे पराभूत करून सुवर्णपदकाची कमाई केली. त्यानंतर रांची तिरंदाजीने 17 व्या क्रमांकाच्या रशियन एलेना ओसीपोवाचा 6-0 असा पराभव केला आणि वर्ल्ड कपमधील चौथे वैयक्तिक पदक पटकावले.

एकंदरीत विश्वचषकात तिच्या नावावर नऊ सुवर्ण, 12 रौप्य व सात कांस्यपदक आहेत. “विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच मी तीनही पदके जिंकली आहेत. मी खरोखर आनंदी आहे परंतु त्याच वेळी, आमच्यात काही अतिशय महत्वाच्या स्पर्धा लागल्या असल्याने मला सुधारत राहायचे आहे,” विजयानंतर दीपिकाने पीटीआयला सांगितले होते. दरम्यान, पुढील महिन्यात टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारी ती एकमेव भारतीय महिला तिरंदाज असेल.