श्रीकृष्ण जयंती नंतर दहीहंडीचा (Dahi Handi) खेळ महाराष्ट्रामध्ये रंगतो. राज्याच्या विविध भागात गोविंदा पथकं हंड्या फोडण्यासाठी मानवी मनोरे रचतात. यंदा दहीहंडीचा खेळ प्रो गोविंदा (Pro Govinda) मुळे अजूनच खास होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षीच दहीहंडीला खेळाचा दर्जा दिल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे इतर खेळाप्रमाणे राज्यात प्रो गोविंदा स्पर्धा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं 18 लाख 75 हजारांची विमा कवच योजना जाहीर केली आहे. ही योजना 8 सप्टेंबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे. राज्यभरातील 75 हजार गोविंदांना शासकीय विमा कवच देण्याचे आदेश जारी केले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा आणखी अतिरिक्त 25 हजार गोविंदांना राज्य सरकारनं विमा कवच दिलं आहे.
दहीहंडी मध्ये सहभागी गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. गोविंदाचा मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना 7.50 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर हात-पाय जायबंदी झालेल्यांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्याच वर्षी केली होती. त्यानुसार, या वर्षासाठी गोविंदांच्या विमा कवच योजनेसाठी राज्य सरकारकडून निधी वर्ग करण्यात आला आहे.
#दहीहंडी उत्सव आणि प्रो-गोविंदा लीग स्पर्धेत मानवी मनोरे रचताना होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. pic.twitter.com/tpkHDrIXoM
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) August 31, 2023
वरळीच्या डोम मध्ये आज प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यांनी पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपूर्वीक्ज प्रताप सरनाईक यांनी राज ठाकरेंचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेत या स्पर्धेचं आमंत्रण दिलं आहे.